Valencia Orange Farming : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक, ॲग्रोवीजन ग्रुप नागपूर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी स्पेन येथील संत्रा शेतीची (Orange Farming) सफर केली. येथील संत्रा शेतीचे तंत्रज्ञान, मिळणारे अधिकचे उत्पन्न यासह येथील संत्रा लागवड व्यवस्थापन, बाजारपेठ व्यवस्थापन आदींची इत्यंभूत माहिती या शेतकऱ्यांनी घेतली.
स्पेन देशातील व्हॅलेन्सिया शहरात मोठ्या प्रमाणात मोसंबी, संत्रा लागवड होते. लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया व उद्योग, नर्सरी व्यवस्थापन, बाजारपेठस्पेन येथे गेलेल्या सर्व शेतकरी बंधूंनी व्हॅलेन्सिया येथील संत्रा बागेस भेट दिली. तेथील माती चुनखडीयुक्त मध्यम दर्जाची असून पाच फूट बेडवर संत्रा झाडाची लागवड केली जाते.
संत्राच्या कलमा हा सर्व सरकारच्या नियमांच्या अधीन राहून तयार केल्या जातात. तिसऱ्या वर्षापासून संत्र्याच्या झाडाचे पीक घेणं सुरुवात होते. तेथील झाडाची उंची आठ ते दहा फुटापर्यंत झाल्याचे तसेच प्रत्येक झाडावर पानांची संख्या भरपूर प्रमाणात आढळून आली. तेथील फर्टीगेशन सरळ ड्रीपच्या माध्यमातून केल्या जाते. तिथे जास्तीत जास्त मल्चिंग पेपर झाकण्यासाठी वापर केले जातो. तिथे लोक पूर्णपणे सामूहिक शेती करतात.
या ठिकाणी टॅंगो ही व्हेरायटी सगळ्यात जास्त फळपीक देणारी असून हेक्टरी 70 टन उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कोर्डोबा संत्रा पॅकिंग हाऊस येथे भेट देण्यात आली. त्यानंतर सेविल येथील पॅकिंग हाऊस व ॲग्रीकल्चर यूनिवर्सिटी येथे भेट देऊन एलईडी स्क्रीन द्वारे माहिती घेतली. संत्रा वर्गीय फळ पिकाचे तंत्रज्ञान मार्केटिंग व्यवस्थापन जाणून घेतले. शेवटच्या दिवशी स्पेनची राजधानी माद्रिद येथील लोकसभा भवनातील बाजारपेठ दाखविण्यात आली.
असे आहे लागवड व्यवस्थापन
या ठिकाणी संत्रा लागवड अंतर 6×20 वर चार फूट उंचीच्या बेडवर केली जाते. एका हेक्टर मध्ये 820 कलम या पद्धतीने बसविल्या जातात. संत्रा झाडाची कटिंग 10 टक्के केली जाते. तसेच वाढलेल्या फांद्या 45 डिग्री अंश सेल्सिअसमध्ये झुकवून दोरीने बेंड करून जमिनीत रोवलेल्या काड्यांना दोरीच्या साह्याने बांधल्या जातात. विशेष म्हणजे संत्राची तोडणी होण्याच्या दोन महिने अगोदर फवारणी बंद केली जाते. फवारणीचे तसेच माती, पाणी परीक्षणाचे निकष तेथील सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या अधीन राहून पूर्णपणे नियम पाळावे लागतात. तेथे हिवाळ्यामध्ये 7 ते 12 डिग्री तर उन्हाळ्यामध्ये 38 ते 44 डिग्री दरम्यान तापमान असते.
व्हलेन्सिया संत्र्यासाठी प्रसिद्ध
व्हलेन्सिया संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेलं स्पेन मधील हे शहर. येथील संत्र्यांची चव आणि दर्जाच न्यारा. केवळ पीक म्हणून नव्हे तर या शहरात संत्रा उत्पादनाकडे एक उद्योग म्हणून बघितले जाते. उच्च दर्जाच्या संत्र्याच्या अनेक जाती या शहराने विकसित केल्या. हेक्टरी 70 टन संत्र्याचे उत्पादन घेणारे व्हॅलेन्सिया उत्पादनपुरते मर्यादित राहिले नाही. तर ग्रेडिंग, शॉर्टिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करत थेट ग्राहकांपर्यंत उच्च दर्जाचा चविष्ट संत्रा पोहोचवण्याचे कसब या शहरातल्या शेतकऱ्यांनी आत्मसात केलं आहे. व्हॅलेन्सियाचा हा संत्रा महाराष्ट्रात पर्यायाने देशात आणून नागपुरी संत्र्याच्या बरोबरीने उत्पादन करतानाच या संत्र्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत्रा पिकाची पर्यायाने संत्रा बागायतदारांची पत कशी वाढवता येईल याबाबत विचार सुरू झालाय.