नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शिरूड येथील शेतकऱ्याने आपल्या चार एकर कांद्याच्या क्षेत्रावर रोटाव्हेटर फिरवून तो नष्ट केला, व्यापारी कांद्याला प्रतिकिलो दोन ते तीन रुपये दर देत असल्याने मेटाकुटीस आल्याने हा निर्णय घेतला. तालुक्यातील इतर भागात कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. भूषण अण्णासाहेब गुंजाळ असे संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे.
यंदाच्या हंगामात भूषण याने आपल्या शेतात कांदा लागवड केली होती. पीक तयार झाल्यानंतर बाजारात विक्रीसाठी प्रयत्न सुरू केला होता. दरम्यान, व्यापाऱ्यांना संपर्क केल्यानंतर कांद्याला प्रतिकिलो दोन ते तीन रुपये भाव असल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांनी सांगितलेला भाव ऐकून शेतकरी गुंजाळ याच्या डोळ्यात अश्रू
आले.
एकरी ६० हजारापेक्षा अधिक खर्च या पिकांवर झाला होता. कांदा बाजार समितीपर्यंत घेऊन जाण्यासाठीही ५० हजार रुपयांचा खर्च होता. बाजारात विक्री केल्यानंतर लागवड आणि वाहतूक असा दोन्हीचा खर्च निघणे अवघड होते. यामुळे छातीवर दगड ठेवून भूषण गुंजाळ याने रविवारी चार एकरात तयार केलेल्या कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरवला. अवघ्या काही क्षणात संपूर्ण शेत नांगरून कांदा पीक नष्ट करण्यात आले.
चार एकरासाठी चार लाखांचा खर्च
कांदा लागवडीसाठी बियाणे, खत, पीक व्यवस्थापनसाठी चार एकरात साधारण चार लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. व्यापारी चांगला दर देत कांदा खरेदी करतील, अशी अपेक्षा या युवा शेतकऱ्याची होती. परंतु बाजारात भाव पडले असल्याने त्याला बाजारात घेऊन जाणे सोयीस्कर नसल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याची माहिती देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला भाव नसल्याने बहुतांश शेतकरी कांदा काढून त्याची बाजारात विक्री करण्यापेक्षा शेतातच काढणीविना सडू देत आहेत.
चार एकरात कांद्याची लागवड केली होती. यासाठी मोठा खर्च झाला. मात्र दोन ते तीन रुपयांपेक्षा जास्त भाव व्यापारी देत नसल्याने संपूर्ण हंगामाचा खर्च वाया जात आहे. वाहतूक खर्च निघणे मुश्किल आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. शेती करायची कशी?
- भूषण गुंजाळ, शेतकरी शिरूड, ता. शहादा.
