- गणेश शेवरे
नाशिक : एकीकडे वर्षभराचे कष्ट, त्यातच बाजारभाव (Market) नाही. यातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने निराश झालेल्या शेतकऱ्यांने कोथिंबिरीच्या शेतामध्ये नांगर फिरवत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
नाशिकच्या (nashik) चांदवड तालुक्यातील तिसगाव येथील शेतकरी बाजीराव बागुल यांनी दोन ते तीन बिगे कोथिंबीर लागवड (Coriander Cultivation) केली होती. यावर शेतकऱ्याने प्रचंड मेहनत घेत कोथिंबीर चांगली फुलवली. पहिली काढणी मजुरांच्या साहाय्याने केली. मात्र बाजारात कोथिंबिरीस कवडीमोल भाव मिळाला. मजुरांचे पैसे व गाडी भाडे देण्यासाठी त्यांना उसनिवारी पैसे घेण्याची नामुष्की आली. घरी आल्यावर कोथिंबिरीच्या शेतात नांगर फिरवला. होणारा खर्च आणि एकरी उत्पादन खर्च याचा मेळ बसत नसल्याने या शेतकऱ्याने पीकच नष्ट केले.
पीक घेण्यासाठी भांडवल लागते. पुढे बाजारभाव मिळाला तर ठीक नाहीतर, केलेला खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण होतात. काही भागातील शेतकऱ्यांची शेती निसर्गाच्या भरवशावर असून, कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नसते. काही शेतकरी विहिरींना मिळेल, त्या पाण्यावर शेती करतात. मात्र अशा परिस्थितीत जर पिकाला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय? पीक पेरणीपासूनची मशागत, लागवड खर्च, मजुरी, खते, औषधे यांची महागाई झाली असताना नफा मिळत नसल्याने निराश होऊन बागुल या शेतकऱ्याने थेट नांगरच फिरवला.
दोन बिगे कोथिंबिर लागवड केली होती. त्यातील काही काढली, बाजारात नेल्यावर कवडीमोल भाव मिळाला. त्यामुळे मजुरांचे काढणीचे पैसे आणि वाहतुकीचा खर्च देण्यासाठी उसनवारी पैसे घेऊन द्यावे लागले. त्यामुळे उर्वरित कोथिंबीरीवर नांगर फिरवला. यासह इतरही पालेभाज्यांचे बाजारभाव उतरले असल्याने मोठे संकट शेतकऱ्यांच्या समोर येऊन ठेपले आहे.
- आनंदा गजराम बागुल , शेतकरी तिसगाव
शेतात नांगर फिरवताना ट्रॅक्टर नादुरुस्त..!
कोशिंबीर या पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याने शेतातल्या कोथिंबीर भाड्याने ट्रॅक्टर आणून नांगर फिरवला. मात्र नांगर फिरवत असताना अचानक ट्रॅक्टर मध्ये बिघाड झाला. त्यावेळी पुन्हा फिटर आणून सदर ट्रॅक्टरची दुरुस्ती या सगळ्यात शेतकऱ्याला आर्थिक झळ सोसावी लागली.