नाशिक : जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शासनाने मोफत नुकसान झालेल्या राज्यातील बाधित शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी गुरुवारी सायंकाळी १७६५ कोटी २२ लाख ९८ हजार रुपये मंजूर केले.
यात नाशिक जिल्ह्यातील चार लाख ३२ हजार ६९५ शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांसाठी तीन कोटी दोन लाख २८ हजार रुपये शासन देईल. तर नाशिक विभागातील आठ लाख ५३ हजार २३५ शेतकऱ्यांना सहा कोटी २६ लाख २६ हजार रुपये मोफत बियाणे व इतर अनुषंगित बाबींकरिता मंजूर करण्यात आले आहे.
प्रति हेक्टरी दहा हजार रुपये (तीन हेक्टरी मर्यादित विशेष मदत) देण्यात येईल. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत जमा होण्यास मागील आठवड्यातच सुरुवात झाली, जवळपास ६० टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा झाली आहे. निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.
डीबीटी पोर्टलद्वारे निधी होणार वर्ग
बाधित शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळणार असल्याने रब्बी हंगामात नुकसान भरून निघेल, अशी आशा बळीराजाला आहे. डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वर्ग करण्यात येणार आहे. मदतीचा तपशील संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध होईल, अशी माहिती कृषी अधिक्षक रवींद्र माने यांनी दिली.
