नाशिक : महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयांत अभ्यासक्रमासाठी उपलब्ध एकूण विविध १६ हजार ८३० जागांपैकी तब्बल तीन हजार जागा रिक्त असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली. नाशिक जिल्ह्यात मात्र पाच कृषी महाविद्यालयांमधील सर्वच जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याने जिल्ह्यातील युवकांचा कृषी अभ्यासक्रमाकडे ओढा वाढला असल्याचे दिसून येते.
नाशिक ८०० पैकी केवळ १२ जागांवर यंदा प्रवेश होऊ शकले नाही. दोन वर्षांपूर्वी २० टक्के जागा रिक्त होत्या. विद्यार्थ्यांचा ओढा इंजिनिअरिंग, सीए, एमबीए अशा अन् काही अभ्यासक्रमांकडे असताना विद्यार्थी बी. एस्सी. (ॲग्रि.) व अन्य कृषी अभ्यासक्रमांकडे वळत आहे.
या अभ्यासक्रमांना पसंती
बी. एस्सी. (ॲग्रिकल्चर) या शाखेला सर्वाधिक प्रवेश आणि मागणी आहे. दोन नंबरचे प्रवेश कृषी अभियांत्रिकी शाखेला असून, कृषी उद्यान, मत्स्यशास्त्र आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या इतर शाखांनाही मागणी वाढली आहे.
या ठिकाणी नोकरीची संधी
कृषी अभ्यासक्रमानंतर ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी तसेच खासगी क्षेत्रात संशोधन, कृषी-व्यवसाय, फलोत्पादन, अन्नप्रक्रिया आणि शेती व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कृषी शास्त्रज्ञ, शेती व्यवस्थापक, कृषी सल्लागार किंवा उद्योजक म्हणून काम करू शकता किंवा बँकांमध्ये कृषी कर्ज विभागातही नोकरीस लागू शकता.
स्वारस्य का वाढले ?
कृषी अभ्यासक्रमांमध्ये वाढलेले स्वारस्य हे वाढत्या लोकसंख्येच्या अन्नसुरक्षेची गरज, कृषी क्षेत्रात होणारे वैज्ञानिक आणि तांत्रिक बदल, शाश्वत शेतीला वाढता पाठिंबा आणि कृषी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकरीच्या विविध संधींमुळे आहे.
जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वाढल्याचे सुखद चित्र आहे. कृषी क्षेत्रात करिअरचा विश्वास, या महाविद्यालयांतील पायाभूत सुविधा, अभ्यासक्रमात तंत्रज्ञानाचा आधार यांमुळे कृषी अभ्यासक्रमांत प्रवेश वाढले आहे. सरकारी कृषी महाविद्यालये आता पूर्वीसारखी न राहता अत्याधुनिक, सुविधायुक्त झाली आहेत. कृषिप्रधान भारतात कृषी अभ्यासक्रमानंतर करिअरची अनेक द्वारे खुली होतात.
- डॉ. सचिन नांदगुडे, प्राचार्य, कृषी विज्ञान संकुल, काष्टी, ता. मालेगाव