Tractor Kharedi In Diwali : सप्टेंबर महिन्यात राज्यात सर्वांत मोठी महाडीबीटी योजनेची सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये ३४ लाख २६ हजार ११३ शेतकऱ्यांची विविध औजारे व घटकासाठी निवड करण्यात आली. यामध्ये सर्वांत जास्त संख्या ही राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची असून यामध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी दिवाळीत यंत्राची खरेदीही केली आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प या तीन वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात.
सप्टेंबर महिन्यात जाहीर झालेल्या सोडतीमध्ये ३४ लाख २६ हजार शेतकरी यंत्राच्या अनुदानासाठी पात्र ठरले. तर कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीच्या आधारे २७ ऑक्टोबरपर्यंत यातील ४४ हजार ६२ शेतकऱ्यांनी दिवाळीत यंत्राची खरेदी केली आहे.
दरम्यान, महाडीबीटी अंतर्गत १५ योजनेसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. ज्यामध्ये ४६ लाख १२ हजार ४३ शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले होते. प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या पद्धतीने २०२० सालापासून आलेल्या अर्जाला प्राधान्य देण्यात आले होते.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार कृषी यांत्रिकीकरणाच्या तीन्ही योजनेतून निवड करण्यात आलेल्या अर्जापैकी १ लाख ८५ हजार ७५० अर्जांना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे. तर २० हजार ४४७ अर्जांची मोका तपासणी करण्यात आलेली असून १२ हजार २५२ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष अनुदान अदा करण्यात आलेले आहे.
किती शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी केले?
ट्रॅक्टर या घटकासाठी ९ लाख ५२ हजार ९३९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली असून सद्यस्थितीत ९ लाख ४४ हजार ४५ अर्ज प्रक्रियेत आहेत. आत्तापर्यंत ट्रॅक्टर खरेदीसाठी ५३ हजार २४१ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे. त्यापैकी ६ हजार ३८० शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करून देयक अपलोड केले आहे.
तर २ हजार ५६४ मोका तपासणी झाली असून १ हजार २६८ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. यासोबत चालू वर्षात कृषी समृद्धी योजनेतून कृषी यांत्रिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
