नाशिक : महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या प्रलंबित मागण्या पंधरा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी फेब्रुवारी महिन्यात दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न केल्याने महाराष्ट्र राज्य कृषी सहायक (Krushi Sahayyak Sanghatana) संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत. ५ ते १५ मे या कालावधीत विविध प्रकारची आंदोलने करण्यात येणार असून राज्यभरात काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.
काय आहेत मागण्या
कृषी सेवक कालावधी रद्द (krushi Sevak) करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहायक (Krushi Sahayyak) पदावर नियुक्ती देण्यात यावी, कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करावे, डिजिटल कामकाजासाठी कृषी सहायकांना लॅपटॉप देण्यात यावेत, ग्रामस्तरावर मदतीसाठी कृषी मदतनीसांची नेमणूक करावी, कृषी निविष्ठा वाटपात वाहन भाड्याची तरतूद करावी किंवा परमिटद्वारे वाटप करावे, कृषी विभागाच्या आकृतीबंधास तत्काळ मंजुरी देऊन त्यामध्ये कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढवून कृषी सहायकांच्या पदोन्नतीमधील कुंटितावस्था दूर करावी.
महसूल विभागाप्रमाणे आकृतीबंध करावा. कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ४ : १ या प्रमाणे करावे, पोकरा योजनेमध्ये समूह सहायकांची पदे पूर्वीप्रमाणे भरण्यात यावी, रोजगार हमी योजनेअंतर्गत लक्ष्यांक देतांना क्षेत्रीय स्तरावरील अडचणीचा विचार करावा, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करणे व तद्भतर करावयाच्या कामाबाबत महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या जबाबदाऱ्यांबाबत योग्य न्यायसंगत कार्यपद्धती तयार करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या मागण्यांची तत्काळ सोडवणूक न केल्यास कृषी सहायक संघटना विविध टप्प्यांवर आंदोलन करणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
...असे असेल आंदोलन
आज म्हणजेच ६ मे पासून कृषी सहायक सर्व शासकीय व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडतील. दि. ७ मे रोजी सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायक धरणे आंदोलन करतील. दि. ८ रोजी एक दिवस कृषी सहायक सामूहिक रजेवर जाणार आहेत. दि. १ पासून सर्व ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकतील. यानंतरही कृषी सहायक यांच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्यास दि. १५ मे पासून सर्व योजनेच्या कामकाजावर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल.
कृषी सहायक हा गाव पातळीवर तीन ते चार गाव मिळून काम करतात. त्यांना कुठल्याही प्रकारची ऑनलाइन कामकाजासाठी लॅपटॉप उपलब्ध नाही. कृषी सहायक यांचे पदनाम सहायक कृषी अधिकारी करावे अशा मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे.
- संतोष गोसावी, कृषी सहायक संघटना येवला (सचिव)