बुलढाणा : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आता वीज कपातीच्या त्रासातून मुक्ती मिळणार असून दिवसा सहज आणि सुरक्षित सिंचन करता येणार आहे.
यापूर्वी कृषिपंपांना वीज नसल्यामुळे रात्री-अपरात्री शेतात जाऊन पाणी देण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर येत होती. मात्र, सौर पंपामुळे ही समस्या कायमची दूर होणार आहे. विशेष म्हणजे, एकदा सौर पंप बसविल्यानंतर वीज बिलाची चिंता पूर्णपणे संपणार आहे.
या योजनेंतर्गत सौर पंपाच्या किमतीवर तब्बल ९० ते ९५ टक्के अनुदान दिले जात आहे. त्यामुळे अत्यल्प खर्चात शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध होत आहे. डिझेलवरील खर्चही वाचणार असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक बचत होणार आहे. रात्रीच्या वेळी साप-विंचू यांचा धोका टाळून आता शेतकरी दिवसा सहज पाणी देऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सी.एस.सी.) केंद्रात जाऊन ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक निर्णय, यांना मिळणार लाभ
सौर ऊर्जेवर चालणारे पंप असल्याने प्रदूषणात घट होणार असून पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळणार आहे.
ज्यांच्याकडे विहीर किंवा बोअरवेल सारखा शाश्वत पाण्याचा स्रोत आहे. ज्यांच्याकडे अद्याप वीज कनेक्शन नाही. ज्यांनी कृषी पंपासाठी अर्ज केला असूनही कनेक्शन मिळालेले नाही.
आवश्यक कागदपत्रे
७/१२ व ८-अ उतारा, आधार कार्ड, जातीचा दाखला, बँक पासबुक, आधारशी लिंक मोबाइल नंबर.
शेताच्या क्षेत्रानुसार ३ एचपी, ५ एचपी आणि ७.५ एचपी क्षमतेचे सौर पंप उपलब्ध करून दिले जात आहेत.
