नाशिक : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १५१९ गावांतील तब्बल २ लाख ४७ हजार १९ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले असून, २ लाख ८३ हजार ५०६ शेतकऱ्यांची पिके मातीमोल झाली आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सर्वाधिक १३५ गावांतील १०,१८०.९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, १६,५९५ शेतकऱ्यांना फटका बसला आहे..अतिवृष्टीमुळे कांदा, द्राक्षबाग, फुलशेती तसेच भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या भागांत विक्रमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरपर्यंत एकूण ९८ गावांमध्ये पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित माहितीनुसार, २८ गावांमध्ये हे काम युद्धपातळीवर सुरू असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनाशी समन्वय साधला जात आहे. अचानक झालेल्या या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्व गणितच विस्कळीत केले आहे. कर्जबाजारीपणाचे ओड़ो वाहत असलेल्या शेतकऱ्यांवर आता अतिवृष्टीच्या संकटामुळे आणखी आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
भरपाईबाबतचे निकष काय?
एकूण लागवड क्षेत्रापैकी ३३ टक्के किंवा त्याहून अधिक पिकांचे नुकसान झाले तरच भरपाई मिळते. यावर्षापासून शासनातर्फे भरपाईचे निकष बदलण्यात आले आहेत. आता प्रत्यक्ष पंचनामे होतील. मात्र, नव्या नियमानुसार पीक कापणीअंती नुकसान ठरविले जाईल.
पाऊस थांबल्यावर पंचनामा होईस्तोवर शेतातील पाण्याचा निचरा झाला असेल तर तितका भाग भरपाईसाठी पात्र ठरविला जात नाही. मात्र, तेथील पीक पिवळे पडले असेल तर भरपाईसाठी तितके क्षेत्र पात्र राहते. कृषी उपसंचालक महेश वेठेकर यांनी वरील माहिती दिली.