पुणे : राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी तसेच मोजणी अचूक करण्यासाठी राज्य सरकारने भूमिअभिलेख विभागाला १२०० नवीन रोव्हर मशीन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
त्यामुळे रोव्हर मशीनची संख्या एकूण संख्या जवळपास तीन हजारांपर्यंत जाणार आहे. सध्या भूमिअभिलेख विभागाकडे राज्यभरात मोजणीदारांची (भूकरमापक) एकूण संख्या जवळपास ४ हजार ६०० इतकी आहे.
भूमिअभिलेख विभागात सध्या १ हजार ७०२ रोव्हर मशीन आहेत, तर कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार एकूण चार हजार रोव्हर मशीनची गरज आहे. एक हजार २०० रोव्हर खरेदी करण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठक झाली. त्यात रोव्हर खरेदीसाठी १३२ कोटी आणि भूमिअभिलेख विभागाच्या नवीन इमारतीच्या बांधकामांसाठी १ हजार ६०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली.
त्यानुसार पुढील वर्षी आणखी एक हजार रोव्हर खरेदी करण्याचे नियोजन आहे, असे भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात 'ई-मोजणी २.०' प्रणाली लागू केली आहे.
त्यामुळे जमीन मोजणी नकाशाची 'क' प्रत डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कामाला गती देण्यासाठी चार हजार रोव्हरची आवश्यकता आहे.
मोजणीसाठी जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी विभागाने 'सर्व्हे ऑफ इंडिया'च्या मदतीने राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स (कंटिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे.
या कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदांत घेता येते. कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्हरमार्फत टॅबमध्ये घेता येते. त्यामुळे कमी वेळेत आणि अचूक मोजणी करण्यास मदत होते.
राज्यात भूमिअभिलेख विभागाची ३५५ कार्यालये असून, त्यात टप्प्याटप्प्याने रोव्हर मशीन उपलब्ध करून देण्यास भूमिअभिलेख विभागाने पुढाकार घेतला आहे. पुण्यात ११८ रोव्हर मशीन आहेत.
नवीन रोव्हर आल्यानंतर पुण्यात रोव्हरची संख्या वाढणार आहे. रोव्हरच्या माध्यमातून सॅटेलाइटद्वारे मोजणी करता येते. मोजणीचा वेळ कमी होतो. त्याचबरोबर अचूक मोजणी करता येते.
नवीन रोव्हर आल्यानंतर पुणे, संभाजीनगर, नाशिकमध्ये जेथे जास्त जमीन मोजणीसाठी अर्ज येतात. तेथे ते उपलब्ध करून देता येतील, अशी माहिती जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
अधिक वाचा: e Pik Pahani : पीक पाहणी झाली आता सोपी; मोबाईल अॅपमध्ये केले 'हे' बदल, वाचा सविस्तर