कोपरगाव (जि. अहिल्यानगर): कोपरगाव तालुक्यातील नऊ गावांतील ५६ शेतकऱ्यांना कुळाने मिळालेल्या भोगवटदार वर्ग २ जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते बुधवारी कोपरगाव तहसील कार्यालयात वाटप करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी (दि. ४) कोपरगाव तहसील कार्यालयास भेट दिली. यावेळी जमिनींचे वाटप केले. त्यांनी सर्व कार्यालय प्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त 'सेवा पंधरवडा' साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या.
त्यानुसार सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कुळ कायदा कलम ४३ (नियंत्रित सत्ता प्रकार) अन्वये कुळास मिळालेल्या जमिनीस खरेदी झाल्यापासून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
त्यांची भोगवटदार वर्ग २ जमीन भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याचा 'नावीन्यपूर्ण उपक्रम' जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी राबविला.
नऊ गावांसाठी उपक्रम
◼️ नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत कोपरगाव तालुक्यात कुळास मिळालेल्या जमिनींचा अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी दप्तरी शोधमोहीम हाती घेतली.
◼️ त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील खिडींगणेश-२३, येसगाव-१, आंचलगाव-१, संवत्सर-१, वारी-१३, चांदेकसारे-१, पोहेगाव-१, गोधेगाव-११ व आपेगाव-४ अशा एकूण ५६ शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे.
◼️ शेतकऱ्यांना कुळाने मिळालेल्या भोगवटदार वर्ग २ जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते बुधवारी कोपरगाव तहसील कार्यालयात वाटप करण्यात आले, अशी माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी दिली.
अधिक वाचा: शेत पाणंद रस्ते दिसणार आता ऑनलाईन; योजना राबवण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना मिळाले विशेष अधिकार
