Join us

उसाचे पाचट कुजविण्याचा कोल्हापुरी पॅटर्न; २८६ कृषी सहायक शेतकऱ्यांच्या बांधावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 10:54 IST

Pachat Kujvane उसाचे पाचट जाळण्याचा धडाका कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच शेती उत्पादनतही घट होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी यावर उपाय म्हणून पाचट जाळण्याऐवजी ते उसाच्या शेतजमिनीत कुजवावे, यासाठी कृषी विभागाने जागृतीची मोहीम हाती घेतले आहे.

आयुब मुल्लाखोची: उसाचे पाचट जाळण्याचा धडाका कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच शेती उत्पादनतही घट होत आहे.

ही स्थिती बदलण्यासाठी यावर उपाय म्हणून पाचट जाळण्याऐवजी ते उसाच्या शेतजमिनीत कुजवावे, यासाठी कृषी विभागाने जागृतीची मोहीम हाती घेतले आहे.

यासाठी जिल्ह्यातील २८६ कृषी सहायक दोन महिने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रबोधन करणार आहेत. जिल्ह्यात उसाच्या पिकाचे क्षेत्र वाढतच चालले आहे. शेतकरी उसाला प्राधान्य देत असल्याने १ लाख ८६ हजार २९५ हेक्टर उसाचे क्षेत्र झाले आहे.

या क्षेत्रातील ऊस कारखान्यांना गाळपासाठी गेल्यानंतर उसाचा पाला मात्र पेटविण्याचे प्रमाण कमी होताना दिसेनासे झाले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून पाचट शेतातच कुजविण्याची मोहीम कृषी विभागाने हाती घेतली आहे.

परंतु, म्हणावा तितका बदल शेतकऱ्यांच्या मानसिकतेत झालेला नाही. यास पश्चिमेकडील भागाची भौगोलिक रचना कारणीभूत असली तरी इतर तालुक्यात मात्र प्रभावी कारण नसताना पाला पेटविला जातो.

याच्या परिणामांचा विचार करता पाला सरीतच कुजवला पाहिजे, हा विचार पुढे आला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी विभागाच्या आढावा बैठकीत पाचट अभियानाच्या जनजागृतीची मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तत्काळ हे अभियान संपूर्ण गतीने पुढे जाणार आहे.

यानुसार तालुका पातळीवर प्रत्येक गावात कार्यरत असणाऱ्या कृषी सहायकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार काम करावे लागणार आहे. विशेष म्हणजे ऊस तोडणी हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले. अजून किमान तेवढेच दिवस हंगाम चालेल.

राहिलेल्या या दिवसांत जो ऊस तुटुन जाणार त्यासाठी ही जागृती मोहीम अधिक लाभदायक ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या बैठका, चर्चासत्रे, मेळावे या माध्यमातून ही मोहीम गतीने राबविली जाणार आहे.

पाचट जाळणे आरोग्यासह जैवविविधतेला घातकजिल्ह्यात १ लाख ८६ हजार २९५ हेक्टर उसाखालील क्षेत्र आहे. करवीर, शिरोळ, हातकणंगले, कागल या तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यात ऊस तुटून गेल्यानंतर सरासरी १० टन प्रति हेक्टरी पाला शेतात उपलब्ध होतो. ७० ते ८० टक्के शेतकरी पाला जाळून टाकतात. ही बाब पर्यावरण, जैवविविधतेला व मानवी आरोग्याच्या दृष्टीने घातक असते. यावर संशोधन झाले आहे.

शेतकऱ्यांनी उसाचा पाला जाळू नये. सरीतच तो कुजवावा. यामुळे शेतीच्या जमिनीचा पोत चांगला राहतो. सेंद्रिय कर्ब वाढतो. उत्पादन वाढण्यास मदत होते. - जालिंदर पांगरे, कृषी अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी

अधिक वाचा: तुम्हालाही पशुप्रदर्शनात मारायची असेल बाजी; पशुपालकांनो अशी करा तयारी

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीशेतीकोल्हापूरजिल्हाधिकारीपर्यावरण