Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Flood: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा महापुरामुळे २० लाख टन ऊस उत्पादन घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:56 IST

जिल्ह्यात गेले सात-आठ दिवस झाले पुराचा विळखा असून, यामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली असून, याचा सर्वाधिक फटका उसाला बसणार आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात गेले सात-आठ दिवस झाले पुराचा विळखा असून, यामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली असून, याचा सर्वाधिक फटका उसाला बसणार आहे.

आगामी गळीत हंगामात किमान २० लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होणार आहे. शिरोळ, करवीर व कागलमधील कारखान्यांना त्याची अधिक झळ बसणार असून, लाखो लिटर दूध घरात राहिल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे बसले आहे.

गेले दहा दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणे मोकळी होती, तोपर्यंत पुराची दाहकता दिसत नव्हती, पण राधानगरीसह सर्वच धरणांतून विसर्ग सुरु झाल्याने पुराचे पाणी सैरभैर झाले. नदी, ओढद्याकाठची हजारो हेक्टर पिके बघता बघता पाण्यात गेली.

गेले आठ दिवस ऊस, भात, सोयाबीन ही पिके पाण्याखाली आहेत. त्यांचे नुकसान होणार आहे. २०२१ च्या महापुरात जिल्ह्यातील ७४ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. तुलनेत यंदा पाणी एकसारखे शिवारात राहिल्याने नुकसान अधिक होण्याचा धोका आहे.

पंचनामे होणार, पण निकषाचे काय?पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर ओसरल्यानंतरच सुरु होणार आहेत. शासनाच्या निकषानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांनाच भरपाई मिळते. ऊस पाण्यातून बाहेर आल्यानंतर लगेचच नुकसानीला सुरुवात होत नाही. पंधरा दिवसानंतर त्याला फुटवे फुटतात, त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या सर्वच उसाला १०० टक्के भरपाई मिळणे गरजेचे आहे.

सोयाबीन थेट कुजायलाच सुरुवात सोयाबीन पाण्याखाली गेले की ते लगेचच कुजण्यास सुरुवात करते. त्या तुलनेत भात पाच-सहा दिवस पाण्याखाली राहिले आणि त्यानंतर खताचा डोस दिला तर ५० टक्के नुकसान टाळता येते.

जिल्ह्यातील क्षेत्र (हजार हेक्टरमध्ये)पाण्याखाली क्षेत्र - ६०ऊसाचे क्षेत्र - ४०किमान २० लाख टन उसाच्या उत्पादनावर परिणाम होणार, हे निश्चित आहे.

दुधाचे ८० लाखांचे नुकसानगेल्या सहा दिवसांत 'गोकुळ'सह इतर दूध संघांचे सुमारे १ लाख ७५ हजार लिटर दूध संकलन होऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसणार असून, उसाचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. - डॉ. अशोक पिसाळ

टॅग्स :कोल्हापूर पूरपूरकोल्हापूरशेतकरीशेतीऊससोयाबीनदूधगोकुळ