Kharif Sowing : यंदाच्या खरीप हंगामात राज्यात आतापर्यंत ७४ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या असून सोयाबीन आणि कापसाची सर्वाधिक लागवड झाली आहे. (Kharif Sowing)
बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने गती घेतली असली तरी मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी राहिल्याने काही ठिकाणी दुबार पेरणीची चिंता कायम आहे.(Kharif Sowing)
यंदा मान्सून नेहमीपेक्षा तीन आठवडे आधी दाखल झाला; मात्र, जून महिन्यात त्याने खंड दिल्याने शेतकऱ्यांचे काहीसे गणित बिघडले. जूनच्या अखेरीस पावसाने जोर धरल्याने बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेरणीसाठी चांगले वातावरण तयार झाले.(Kharif Sowing)
राज्यात खरीप हंगामासाठी एकूण १४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टर क्षेत्र निश्चित असून त्यापैकी आतापर्यंत १०७ लाख ५० हजार हेक्टर (७४%) क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.(Kharif Sowing)
सोयाबीन आणि कापसाचे वर्चस्व
राज्यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची झाली आहे. आतापर्यंत ४० लाख ६० हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. त्यानंतर ३३ लाख ५९ हजार ७३० हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे.
कापसाच्या लागवडीत अमरावती आणि नागपूर विभाग आघाडीवर आहेत.
अमरावती विभाग : ८ लाख ८३ हजार ८७५ हेक्टर
नागपूर विभाग : ५ लाख १७ हजार ७९७ हेक्टर
मराठवाड्यात पावसाचा कमी जोर
जिल्हानिहाय पाहता बहुतांश भागात पावसाने सरासरी गाठली असली तरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे काही भागांत पेरणीवर विपरीत परिणाम झाला असून काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट भेडसावत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
विभागनिहाय पेरणीची स्थिती (हेक्टरमध्ये)
विभाग | पेरणी क्षेत्र |
---|---|
अमरावती | २५,७०,५५१ |
लातूर | २४,०२,७९५ |
छत्रपती संभाजीनगर | १८,३७,४४४ |
नाशिक | १५,२०,८४८ |
पुणे | ९,७९,५७८ |
नागपूर | ९,२२,१०३ |
कोल्हापूर | ३,९३,०४२ |
कोकण | ८८,२९७ |
आगामी पावसाची आस
राज्यात उर्वरित २६ टक्के क्षेत्रातही लवकरच पेरण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला नाही, तर दुबार पेरणीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसण्याची भीती आहे.