Join us

Kharif Season 2024 खरिप पेरणी क्षेत्राचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने केला जाहीर; कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 1:35 PM

खरीप हंगाम तोंडावर असताना राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० लाख हेक्टर क्षेत्र कमी होईल, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे : खरीप हंगाम तोंडावर असताना राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० लाख हेक्टर क्षेत्र कमी होईल, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार १४२ लाख ८८ हजार हेक्टरसाठी २४ लाख ७३ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाखालील क्षेत्रात कोणतीही वाढ किंवा घट अपेक्षित नसली तरी कापूस पिकाखालील क्षेत्रात सुमारे ३ लाख हेक्टरची घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात ६ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पेरण्यांसाठी कृषी विभागाने जिल्हास्तरीय आढावा जवळपास पूर्ण केला असून आचारसंहितेच्या कारणामुळे राज्यातील एकत्रित आढावा घेण्यासाठी सहा जूननंतरचा मुहूर्त सापडेल, असा अंदाज आहे.

तत्पूर्वी, कृषी विभागाने राज्यात १४२.८८ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र १५२.१३ लाख हेक्टर इतके अपेक्षित करण्यात आले होते. त्यामुळे यंदा त्यात सुमारे १९ लाख हेक्टर क्षेत्राची घट होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

असे असले तरी राज्यात गेल्यावर्षी प्रत्यक्षात १३० लाख हेक्टरवरच खरिपातील पिकांची लागवड झाली होती. अपुऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरिपाच्या पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. त्याचा फटका एकूण उत्पन्नावर झाला होता.

कापसाचे पुरेसे बियाणेकापूस पिकाच्या लागवडीसाठी दरवर्षी १ जूननंतर बियाण्यांच्या विक्रीला परवानगी दिली जाते. बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी राहावा असा त्यामागील उद्देश आहे. मात्र, बनावट बियाण्यांच्या विक्रीला या कालमयदिमुळे प्रोत्साहन मिळत असल्याने कृषी विभागाने यंदा ही परवानगी १५ मेपासूनच दिली आहे. त्यासाठी १ कोटी ५० लाख बियाण्यांची पाकिटे लागणार आहेत. तर सध्या १ कोटी ७० लाख पाकिटांची उपलब्धता असल्याने शेतकयांनी जादा किमत देऊन बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सोयाबीनसाठी ३८ लाख क्विंटल बियाणे हवेराज्यात सोयाबीनची लागवड ५० लाख ७० हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज आहे. प्रति हेक्टरी ७५ किलो बियाण्यांची गरज असल्याने एकूण ३८ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे पेरणीसाठी लागणार आहे. ३५ टक्के बियाणे बदल दरानुसार १३ लाख ३१ हजार क्विंटल बियाण्यांची गरज आहे. महाबीजकडून ३ लाख क्चिटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून ४४ हजार क्विंटल, तर खासगी कंपन्यांकडून १४ लाख ९३ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धता होईल.

■ भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनवर चांगला परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये ला निनाचा प्रभाव अधिक असल्याने पावसाळा चांगला राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.■ दुसरीकडे कृषी विभागाने मात्र १० लाख हेक्टरने क्षेत्र कमी होईल, असेही जाहीर केले आहे. यात प्रामुख्याने कापूस पिकाखालील क्षेत्रात सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्रात घट होईल, असा अंदाज कृषी विभागाला आहे.■ खरीपात १९ लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यात महाबीजकडून ३ लाख ७५ हजार ५७२, राष्ट्रीय बियाणे महामंडळा- फडून ५९ हजार ७६०, खासगी कंपन्यांकडून २०, ३८,५५१ क्विंटल बियाणे उपलब्ध होतील.

प्रमुख पिकांखालील अंदाजित क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये)सोयाबीन - ५०.७०कापूस - ४०.७०भात - १५.३०तूर - १२.२५ मका - ९.८० बाजरी - ४.१० उडीद - २.८३ मुग - २.०भुईमुग - १.७०ज्वारी - १.२५इतर पिके - २.०४

अधिक वाचा: Kharif Seed शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करण्यापूर्वी अशी घ्या काळजी

टॅग्स :खरीपपीकशेतकरीशेतीसरकारपेरणीसोयाबीनबाजरीभातमकाज्वारीतूरकापूसमूग