राहुरी : अवकाळी पावसामुळे कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी २५ ते ३० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांच्या कांदा रोपांची उगवण होऊ शकली नाही.
त्यामुळे कांदा रोपासाठी मारामार होत असून, जास्तीचे पैसे मोजूनदेखील लागवडीसाठी रोप मिळणे दुरापास्त झाले आहे. रोप मिळत नसल्याने यांत्रिकीकरणाच्या साह्याने कांदा बियाणे पेरणीवर भर दिला जात आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करूनदेखील यंदा कांद्याचे सोनं होणार की माती? अशी भीती शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे. दुसऱ्या बाजूला ऊसतोडीअभावी लागवडी खोळंबल्या आहेत. तसेच ऊस तोडणीसाठी मजुरांकडून पैशाची मागणी केली जात आहे.
मागील वर्षी कांद्याला समाधानकारक भाव मिळाला. त्यामुळे उसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसाच्या शेतीपाठोपाठ कांदा शेती करण्यावर अधिकचा भर दिला आहे.
त्यामुळे यंदाच्या वर्षी मागील वर्षीपेक्षा कांद्याच्या लागवडीमध्ये निश्चितच वाढ होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.
मात्र यंदाच्या वर्षी ऊसतोडीसाठी टोळ्यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे उसाच्या तोडीअभावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या लागवडी खोळंबल्या आहेत.
कांद्याचे बी, रोपाचा भाव- एक एकर कांदा लागवड करण्यासाठी कमीत कमी तीन किलो बी लागते.- त्यासाठी आठ ते नऊ हजारांचा खर्च येतो. रोप लागवडीपर्यंत येईपर्यंत त्याच्यावर पंधरा हजार रुपयेपर्यंत इतका खर्च आहे.- तर ज्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी रोप कमी पडत आहे ते शेतकरी एक एकर कांदा लागवडीसाठी २५ ते ३० हजार देऊन रोप खरेदी करत आहेत.
कांदा लागवडीसाठी एकरी खर्चनांगरट : २,५००रोटा : २,५००सरी पाडणे : १,५००रोप : २५,०००लागवड : १२,०००वाहतूक : १,००० अंतरानुसारऔषध/खते : १५,०००खुरपाणी : ७,०००काढणी : १२,००० अंदाजेवाहतूक : ५००/८०० प्रती खेपइतर खर्च : १०-१५ हजारसर्व खर्च एकरी ८० ते ९० हजार रुपये इतका येतो.
मागील वर्षी कांद्याला समाधानकारक भाव मिळाला. त्यामुळे यंदा कांदा लागवड केली आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगांचा सामना करावा लागत आहे. पाण्यावाणी पैसा खर्च करत आहे. परंतु पुढे काय होणार? याची शाश्वती नाही. - सचिन म्हसे, कांदा उत्पादक
वातावरण बदलाचा फटका ढगाळ हवामान असल्याने कांदा पिकावर करपा रोग व फूल किडे यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कृषी विद्यापीठे किंवा कृषी विज्ञान केंद्र यांनी शिफारस केलेल्या बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी तत्काळ करावी. - बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी
सततच्या ढगाळ वातावरणामुळे रोपावर व कांदा पिकावर मावा तसेच फूल किडे यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तीस ते पस्तीस टक्के रोपाची मार झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी लागवड होईल. मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. भाव मिळेल की नाही? याची शाश्वती नाही. - सोमेश्वर (गणेश) भिंगारकर, शेतकरी