बालाजी आडसूळ
मार्च महिन्यात पट्टा पडलेल्या २०२५-२६ या गाळप हंगामातील साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीचा लेखाजोखा घेतला असता, यंदाही धाराशिव जिल्ह्यातील गाळपात कळंब तालुका अग्रेसर ठरला असून, जिल्ह्यात झालेल्या एकूण गाळपात कळंबचा हिस्सा तब्बल २५ टक्के इतका आहे.
लॉकडाऊनच्या पर्वानंतर, एका पावसाळ्याचा अपवाद वगळता वरूणराजा भरभरून पावला आहे. पाऊस सरासरीचा उंबरठा ओलांडणारा ठरल्याने उसाच्या बागायती शेतीला अधिकच बळ मिळाले. त्यावर निर्भर असलेली साखर कारखानदारी उसाची उपलब्धता शाश्वत होत चालल्याने स्थिरावली.
मागच्या गळीत हंगामात यामुळेच कळंब तालुक्यातील तीन खासगी साखर कारखाने, चार गुळ कारखान्यांनी कमी-अधिक प्रमाणात 'क्रशिंग सीझन' केला. यात गुळ कारखान्यांची आकडेवारी अद्याप 'साखर आयुक्त' अखत्यारित न आल्याने प्राप्त होऊ शकली नाही.
मात्र, हाती आलेल्या साखर कारखान्यांच्या गाळपाचा मागोवा मात्र दिलासादायक चित्र दर्शवत आहे. यानुसार तालुका यंदाही गाळप, साखर उत्पादनात अग्रेसर ठरला आहे.
साखर उत्पादनातही पुढे
यंदाच्या हंगामात धाराशिव जिल्ह्यात ६१ लाख मेट्रिक टन ऊसापासून ४९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. यात एकट्या कळंब तालुक्याचा २८ टक्के वाटा आहे. इथल्या रांजणी, हावरगाव व चोराखळी येथील तीन साखर कारखान्यांत तब्बल १३ लाख ३० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.
नॅचरल पुन्हा जिल्ह्यात 'टॉप'
• रांजणीचा नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज १० लाख १० हजार मेट्रिक टनाचे गाळप करून यंदाही जिल्ह्यात 'टॉप'ला राहिला. साखर उत्पादनातही ८ लाख ८८ हजार क्विंटल उत्पादन घेत तो अव्वल राहिला.
• २ नोव्हेंबरला श्रीगणेशा अन् ३१ मार्चला सांगता करून तब्बल १४५ दिवस क्रशिंग करून सर्वाधिक गाळप दिवसाचा तो मानकरी ठरला.
ते रेकॉर्ड अद्वितीय...
हंगाम २०२१-२२ मध्ये कळंब तालुक्यातील साखर व गुळ कारखान्यांनी तब्बल २० लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले होते. यात एकट्या नॅचरलने ११ लाख २५ हजार, हावरगावच्या डीडीएनने ३ लाख ७८ हजार तर धाराशिव साखरने ३ लाख २ हजार मेट्रिक टन गाळप केले होते. या हंगामात साखरेचेही तब्बल १७ लाख क्विंटल उत्पादन घेतले होते.
अंतिम उतारा किती?
ऊस उतारा आल्याशिवाय गाळप होत नाही. मग कारखान्यांचा अंतिम उतारा १२ च्या आत कसा राहतो? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. यंदाचा उतारा निश्चितच चिंता वाढवणारा असल्याने आयुक्त कार्यालयाने यंदाचा अंतिम उतारा जाहीर करावा, अशी मागणीही पुढे येत आहे.
६१ लाख २८ हजार मे. टन उसाचे गाळप
• जिल्ह्यातील ८ खासगी व ६ सहकारी (खासगी व्यवस्थापनासह) १४ साखर कारखाने २०२५-२६ च्या गाळप हंगाम फडात उतरले होते. त्यांनी ६१ लाख २८ हजार मे. टन उसाचे गाळप केले.
• यात कळंब तालुक्यातील रांजणीच्या नॅचरलचे १० लाख, हावरगावच्या डीडीएनचे ३ लाख, चोराखळीच्या धाराशिव साखरचे २ लाख १७ असा एकूण तब्बल १५ लाख २९ हजार मेट्रिक टन एवढा वाटा.
धाराशिव जिल्हाभरातील स्थिती
• जिल्ह्यात नॅचरल खालोखाल मंगरूळच्या (तुळजापूर) कंचेश्वरने ६ लाख २९ हजार, समुद्राळच्या (उमरगा) क्विनर्जीने (भाऊसाहेब बिराजदार स. सा) ५ लाख ७८ हजार, भूमच्या आयान मल्टिट्रेडने (बाणगंगा स. सा) ५ लाख ७६ हजार मे. टन गाळप केले.
• खेडच्या (लोहारा) लोकमंगलने ५ लाख ७७हजार, सोनारीच्या (परंडा) भैरवनाथने ५ लाख ११ हजार, केशेगावच्या (धाराशिव) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सह. कारखान्याने ५ लाख १० हजार, ढोकीच्या भैरवनाथ शुगरने (तेरणा) ४ लाख ८१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले.
• तालुकानिहाय विचार करता कळंब तालुक्यातील तीन कारखान्यांनी १५ लाख, परंड्याच्च्या दोन युनिटनी १० लाख ८७ हजार, धाराशिवच्या दोन युनिटनी ९ लाख ९२ हजार, वाशीच्या तीन कारखान्यांनी ४ लाख १९ हजार मे. टन गाळप केले.
Web Summary : Kalamb taluka leads Dharashiv in sugar production, contributing 25% of the district's total. Natural Sugar factory tops with 10.10 lakh metric tons crushed. The area's three factories produced 13.30 lakh quintals of sugar, highlighting agricultural strength after favorable monsoons.
Web Summary : कलंब तालुका धाराशिव में चीनी उत्पादन में सबसे आगे है, जो जिले के कुल उत्पादन का 25% है। नेचुरल शुगर फैक्ट्री 10.10 लाख मीट्रिक टन के साथ शीर्ष पर है। क्षेत्र की तीन फैक्टरियों ने 13.30 लाख क्विंटल चीनी का उत्पादन किया, जो अनुकूल मानसून के बाद कृषि शक्ति को उजागर करता है।