रत्नागिरी: बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन काजू पिकाची घटलेली उत्पादकता, त्यामुळे काजू बीचे दर गडगडतात. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान होते.
नुकसान टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे काजू बीसाठी राबविण्यात येणारी शेतमाल तारण योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
काजू बी हंगामाची सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या हंगामासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येणार आहे. काजू बी नाशवंत नसल्यामुळे सुरक्षित राहते.
सहा महिन्यात दर चांगला प्राप्त होताच काजू बी विकून बाजार समितीचे कर्ज परत फेडता येते. काजू बीसाठी शेतकऱ्यांना त्या दिवसाच्या बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज देण्यात येते. दरवाढीनंतर विक्रीतून कर्जाची परतफेड करता येते.
काय आहे सरकारची शेतमाल तारण योजना? बाजारभाव गडगडल्यानंतर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काजू बी तारण ठेवून कर्ज रक्कम दिली जाते.
व्याजदर किती? काजू बीसाठी शेतकऱ्यांना त्या दिवसाच्या बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज देण्यात येते. १८० दिवसांसाठी सहा टक्के व्याजदराने कर्जाची उपलब्धता करून दिली जाते. दरवाढीनंतर कर्ज रक्कम शेतकऱ्यांना परतफेड करता येते.
चार वर्षांत ५१ शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभगेल्या चार वर्षात जिल्ह्यातील ५१ शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला आहे.
नवीन काजू बी हंगामासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येणार असून दि. १५ एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. - पांडुरंग कदम, सचिव, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी