शेतकऱ्यांना कापूस विक्रीपूर्वी कपास किसान ॲपवर नोंद करण्याचे आदेश सीसीआयने काढले आहे. शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंद केल्यानंतर कापूस विक्रीपूर्वी बाजार समित्यांना त्याचे अप्रूव्हल द्यावे लागणार आहे.
हे अप्रूव्हल देण्यासाठी पणन विभागाने बाजार समित्यांना युजर आयडी दिला आहे. ही प्रक्रिया राबविल्यानंतर कापूस विक्रीला आणल्यानंतर उलट तपासणी होणार आहे.
खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे हमीदर सर्वाधिक राहणार आहेत. यामुळे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची सीसीआयच्या केंद्रावर सर्वाधिक गर्दी होणार आहे. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी कपास किसान ॲपवर नोंद करण्याच्या सूचना सीसीआयने काढल्या होत्या.
त्यासाठी विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर तशी नोंद करणे बंधनकारक होते. त्यासाठी ईपीक नोंदणीमध्ये कापसाचा उल्लेख आवश्यक आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे. यातील ६० हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी कपास किसान ॲपवर नोंद केली आहे. यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी निर्धारित केला आहे.
यासाठी १८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपवर तशा नोंदीच केल्या नाहीत. यामुळे निर्धारित कालावधीत नोंद न झाल्यास अडचणी वाढणार आहे.
ॲपवर नोंदणी केल्यानंतर होणार पुढील प्रक्रिया
शेतकऱ्यांनी ॲपवर नोंद केल्यानंतर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बाजार समिती अप्रूव्हल मिळवून देणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी अलॉटमेंट मंजूर होणार आहे. ही प्रक्रिया बाजार समिती पूर्ण करणार आहे.
प्रत्यक्षात शेतकरी कापूसविक्रीकरिता घेऊन आल्यावर त्यांनी दाखल केलेले कागदपत्र खरे होते का याची तपासणी केली जाणार आहे. त्यात बोगस कागदपत्रे आढळले तर असा कापूस रोखला जाणार आहे.
६० हजार नोंदी आल्या आहेत. अप्रूव्हल देण्याची प्रक्रिया बाकी आहे. युजर आयडी क्रमांक बाजार समित्यांना देण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. - नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ.