नागपूर : जवस पीक हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. जवसाचा उपयोग तेल काढणे आणि धागा निर्मितीसाठी देखील केला जातो. जवस हे पौष्टिक असून, यातून आठ प्रकारची प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे व खनिजे मिळतात, जवसाच्या तेलात ५८ टक्के ओमेगा तीन, ओमेगा सहा, कोलेस्टेरॉल आणि अँटिऑक्सिडंट असतात.
जवसाला बाजारात चांगली मागणी असते. भावही चांगला आहे. परंतु, नागपूर जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात ४३ हेक्टर क्षेत्रावर जवस पिकाची पेरणी करण्यात आली आहे. लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून पीक स्पर्धा घेऊन शेतकऱ्यांना तेलबिया पीक लागवडीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, जिल्ह्यातील चार तालुक्यांत याची पेरणी असली तरी क्षेत्र फारच कमी आहे. पीक घेताना अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात ४३ हेक्टरवर पेरा
नागपूर जिल्ह्यात जवस पिकाचा ४३ हेक्टरवर पेरा करण्यात आला आहे. यात सर्वाधिक रामटेक तालुक्यात २७ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. मौदा तालुक्यात ७ हेक्टर तर, कुही तालुक्यात ५ हेक्टर आणि भिवापूर तालुक्यात दोन हेक्टरवर जवस पिकाची पेरणी करण्यात आली आहे.
जवसाला भाव काय ?
विविध जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात दर आढळून येतात. नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जवस पिकाला १० ते १२ हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो.
सर्वाधिक पेरा रामटेक तालुक्यात
नागपूर जिल्ह्यात जवसाची सर्वाधिक २७.५० हेक्टरवर पेरणी रामटेक तालुक्यात करण्यात आली आहे. जवसाचे पीक तुरळक प्रमाणात कुही, भिवापूर व
मौदा तालुक्यात घेतले जाते.
भाजीपाला, हरभरा, गव्हाकडे कल
जवस उत्पादक शेतकऱ्यांना मळणी यंत्र उपलब्ध होत नाही. पूर्वी पारंपरिक पद्धतीने खळे करून मळणीचे काम होत होते. मात्र, यामध्ये बैलजोडी आणि मजुरांची गरज भासते. बैलजोडी व मजूर मिळत नाही. अशा अडचणींचा सामना करावा लागतो. - सदाशिव लांबट, शेतकरी
उत्पादन अपेक्षित होत नाही. जवसाकडे पीक म्हणून बघितले जात नाही. शेतकऱ्यांचा नगदी पीक घेण्याकडे कल असतो. रब्बी हंगामात भाजीपाला, हरभरा, गहू अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. - गोवर्धन शेकापुरे, शेतकरी