नारळाच्या झाडांची वाढ चांगली झालीये मात्र झाडं फळं देत नाहीत? ही तक्रार अनेक बागायतदारांपासून घरगुती झाडं लावणाऱ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये ऐकू येते. त्याचे कारण हि तसेच आहे आपण रुजवलेल्या झाडाची फळे कुणाला नको असावीत.
मात्र आपण हे लक्षात घ्यावे नारळ हे उष्ण कटिबंधीय हवामानातील झाड असून ते दीर्घकाळ फळ देत राहू शकते पण त्यासाठी त्याच्या विविध गरजांची पूर्तता होणं वेळोवेळी गरजेचे असतं. याच अनुषंगाने पाहूया अशा परिस्थितीमागची काही प्रमुख कारणं आणि सोपे उपाय.
झाडाला नारळ येत नाही याची काही कारणे
• सूर्यप्रकाशाचा अभाव - नारळाच्या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो. दिवसातून किमान ६ ते ८ तास थेट सूर्यप्रकाश मिळाल्यास झाड निरोगी राहते आणि फळधारणा चांगली होते. झाड जर सावलीत लावले असेल किंवा आजूबाजूला उंच झाडांनी त्याचं आभाळ झाकलेलं असेल तर नारळ येणं कठीण जातं.
• पोषक तत्त्वांची कमतरता - पाने हिरवीगार दिसत असली तरी मातीमध्ये जर नायट्रोजन, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारख्या आवश्यक अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर झाड फुलं आणि फळं देण्यात मागे पडतं. झाडाच्या फळधारणेची ताकद यावरच अवलंबून असते.
• मातीचा निचरा खराब असणे - नारळाला चांगल्या निचऱ्याच्या जमिनीची गरज असते. पाणी साचत असेल माती चिकटसर किंवा फारशी वायुवीजन नसलेली असेल तर झाडाची मुळे व्यवस्थित पोषण घेऊ शकत नाहीत. परिणामी, फळधारणा होत नाही.
• कीटक किंवा रोगांची बाधा - कधी कधी झाड स्वस्थ दिसत असलं तरी आतून त्यावर माइट्स (सूक्ष्म कीटक), फुलकळी कुजणे किंवा इतर रोगांची बाधा झालेली असते. यामुळे फुलं गळून जातात किंवा फळ तयारच होत नाही.
• देखभाल आणि छाटणीचा अभाव - मृत किंवा वाळलेली पानं, तणांची वाढ आणि जमिनीभोवतीची अस्वच्छता देखील झाडाच्या वाढीला अडथळा ठरते. या गोष्टी लक्षात न घेतल्यास झाडाची नैसर्गिक वाढ आणि फळधारणा चक्र विस्कळीत होते.
काय उपाय करावेत
• सूर्यप्रकाश मोकळा करा - झाड जिथे लावलं आहे तिथे दिवसातून किमान ६ तास तरी थेट सूर्यप्रकाश मिळतो का हे पाहा. अनेकदा आजूबाजूच्या झाडाच्या सावलीमुळे सूर्यप्रकाश पोहचत नाही. तेव्हा सावली करणारी झाडं छाटून टाका.
• खतांचा योग्य वापर करा - दर तीन महिन्यांनी संतुलित खत द्या. ज्यात चांगले कुजलेले शेणखत किंवा रासायनिक खते तसेच बोरॉनसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील उपयोगी पडतात.
• माती सुधारण्यासाठी उपाय करा - माती जड असल्यास त्यामध्ये कंपोस्ट, वाळू किंवा सेंद्रिय पदार्थ मिसळून हलकी करा. गरज असल्यास झाडाभोवती थोडा उंच भाग तयार करा जेणेकरून पाणी साचणार नाही.
• रोग-कीड नियंत्रणासाठी निरीक्षण ठेवा - ठराविक दिवसांनी नियमित झाडाची तपासणी करा. पाने डागाळत असतील तर स्थानिक कृषी सेवा केंद्रामधून योग्य सल्ला घ्या.
• झाडाची नियमित देखभाल करा - झाडाभोवती तण साफ करा, वाळलेली पानं आणि फांद्या काढून टाका. मुळांना वायुवीजन मिळेल याची काळजी घ्या.
झाड नवीन असेल तर परिपक्व होऊ द्या
नवीन लावलेलं नारळाचं झाड फळं देण्यासाठी ४ ते ६ वर्षं घेतं. काही वेळा झाड वाढत असलं तरी फळधारणा सुरुवात होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे थोडा संयम बाळगा आणि झाडाला परिपक्व होऊ द्या.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र