चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : मागायला गेले सोने-चांदी मिळाले पितळ अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या इथेनॉल दरवाढीच्या निर्णयावर बुधवारी साखर उद्योगात व्यक्त झाली.
उसाच्या रसापासून तसेच बी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात किमान दीड ते दोन रुपयांची वाढ प्रति लिटरमागे होईल, तसेच साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याचा निर्णयही होईल, अशी अपेक्षा साखर उद्योगाची होती. मात्र, ती फोल ठरली.
यामुळे साखर कारखाने अडचणीत येण्याची शक्यता असल्याने कारखानदार चिंतेत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने सी हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात ३ टक्के वाढ करत तेल कंपन्यांसाठी प्रति लिटर ५७ रुपये ९७ पैसे हा खरेदी दर निश्चित केला.
मात्र, सी हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण अत्यल्प असल्याने कारखानदारांना त्याचा फारसा फायदा होणार नाही. यामुळे साखर उद्योगाला फार मोठा दिलासा मिळणार नाही.
साखर उत्पादन घटणार
चालू हंगामात देशातील साखरेचे उत्पादन २६५ लाख टनाच्या आसपासच राहण्याची शक्यता आहे. देशाची गरज २२० लाख टन असल्याने मागणीपेक्षा उत्पादन कमी राहणार आहे. उसाच्या रसापासून तसेच बी हेवीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात वाढ केल्यास इथेनॉलचे उत्पादन वाढेल. मात्र, साखरेचे उत्पादन कमी होईल या शक्यतेनेच सरकारने या दोन्ही इथेनॉलचे दर वाढवले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इथेनॉल उद्योग सद्य:स्थिती
उत्पादन क्षमता : १,६८५ कोटी लिटर (नोव्हेंबर २०२४ पर्यंत)
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण : १६.९ टक्के (डिसेंबर २०२४)
इथेनॉल पुरवठा : ५५० कोटी लिटर (२०२३-२४ मध्ये)
पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रणासाठी इथेनॉलची गरज : १,०१६ कोटी लिटर
साखरेच्या विक्री दरात वाढ हाच उपाय
गेल्या चार-पाच वर्षांत साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रति क्विंटल कायम आहे. उत्पादन खर्च ४१६६ रुपये आहे. त्यामुळे हा विक्रीदर वाढवावा, अशी मागणी कारखानदार सातत्याने करीत आहेत. मात्र, सरकारने तिला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या आहेत. यामुळे एफआरपी देतानाही कारखानदारांच्या नाकीनऊ येत आहेत. साखरेचा विक्रीदर वाढवणे हाच या अडचणीतून बाहेर पडण्याचा उपाय आहे.
इथेनॉलचे दर प्रति लिटर
उसाच्या रसापासून : ६५.६१ रुपये
बी हेवीपासून : ६०.७३ रुपये
सी हेवीपासून : ५७.९७ रुपये
इथेनॉलमध्ये अपेक्षित दरवाढ न झाल्याने, तसेच साखरेचा किमान विक्री दर न वाढवल्याने साखर कारखान्यांना एफआरपी वेळेत देता येईल की नाही, याबाबत शंका आहे. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ
केंद्र सरकारने ४० लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्याला परवानगी दिली आहे तसेच दहा लाख टन साखर निर्यातीलाही मंजुरी दिली आहे यंदा साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने राहिलेल्या उसापासून साखरच तयार व्हावी आणि देशात साखरेची टंचाई निर्माण होऊ नये यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला असावा. - प्रफुल्ल विठलानी, चेअरमन ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन
अधिक वाचा: Union Budget 2025 : केंद्राच्या अर्थसंकल्पात होऊ शकतात ह्या पाच महत्वाच्या घोषणा; वाचा सविस्तर