cheese analogue vs paneer हॉटेलमध्ये तुम्ही पनीर खाताय की पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉग हे तुम्हाला मेन्युकार्ड बघूनच कळणार आहे.
पदार्थात नैसर्गिक पनीरऐवजी 'चीज अॅनालॉग' वापरल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्युकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर करणे हॉटेल मालकांसाठी कायदेशीररित्या बंधनकारक केले आहे.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यात सुरू केलेल्या या मोहिमेची दखल केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने घेतली आहे. प्राधिकरणाने २१ एप्रिल रोजी तसे परिपत्रक काढून हा नियम लागू केला.
ग्राहकांना आपण नक्की काय खातोय हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असून, पनीरच्या नावाखाली भेसळ करणाऱ्यांचे धाबे आता दणाणणार आहेत, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
भाजप आमदार विक्रम पाचपुते म्हणाले, मागील हिवाळी अधिवेशनात मी पनीर आणि चीज 'अॅनालॉग'बाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. देशातील सर्वच ग्राहकांच्या दृष्टीकोनातून हा आदेश महत्त्वाचा आहे
पनीर व चीज अॅनालॉग यांच्यातील फरक
◼️ पनीर हा केवळ दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे.
◼️ डेअरी अॅनालॉगच्या हा दूधाव्यतिरिक्त खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून तयार केला जातो.
◼️ तो दिसायला पनीरसारखा असला, तरी पनीर नसून 'चीज अॅनालॉग'या प्रवर्गात मोडतो.
कुठे कराल तक्रार?
प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचा आदेश काय आहे?
◼️ प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटला जर एखाद्या पदार्थात दुधापासून बनवलेल्या नैसर्गिक पनीरऐवजी वनस्पतीजन्य फॅट्सपासून बनवलेले 'अॅनालॉग' वापरले असेल, तर त्याची माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक आहे.
◼️ चीज अॅनालॉगच्या पुरवठादारांना विक्री बिलावर त्याचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल.
◼️ १ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जाईल.
◼️ जे हॉटेल चालक माहिती लपवतील, त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांचा परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो.
अधिक वाचा: शेतकऱ्यांची उसाची बिलं मिळण्याचा मार्ग मोकळा; राज्यातील 'या' कारखान्यांना एनसीडीसीकडून कर्ज मंजुरी
