प्रकाश महाले
अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून साकारलेल्या शेततळ्यांच्या माध्यमातून आता आदिवासी शेतकरी रब्बीच्या पिकांबरोबर भाजीपाला व फुलशेतीचे मळे फुलवू लागला आहे.
आदिवासी भागात खरिपाचे भात हे एकमेव मुख्य पीक घेतले जात असे. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने यावरच संपूर्ण वर्षाची आर्थिक गुजराण अवलंबून होती. पुढे मुळा बारमाही होऊ लागली आणि शेती पद्धतीत बदल होत गेले. मात्र, हे पाणी काही शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत नेणे जिकरीचे होते.
अशा शेतकऱ्यांनी आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून शेततळे उभारले आणि या पाण्यावर रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, भाजीपाला व झेंडू यांसारखी पिके घेऊ लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्रोत निर्माण झाले आणि जीवनमान उंचावण्यास मदतही झाली.
अकोले तालुक्यातील कोहणे, विहीर, तळे, शिंदे, लव्हाळी ओतूर, लव्हाळी कोतुळ, कोथळे, वागदरी व पाचनई या एकाच मंडळातील गावांमध्ये १६३ शेततळी पूर्ण झालेली आहेत.
सध्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना -पाणलोट विकास घटक २ योजनेची स्थानिक समुदायामध्ये जागरूकता निर्माण करून जनजागृती करण्यासाठी व लोकसहभागातून योजनेच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत पाणलोट यात्रा सुरु आहे.
दरम्यान पर्यावरणस्नेही विशाल लाहोटी, कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी विविध योजनांची माहिती दिली आहे. तर अजय भांगरे, काळू नाडेकर, विठ्ठल भांगरे व श्री लक्ष्मण कोरडे या शेतकऱ्यांनी झालेले फायदे सांगितले.
यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी कपिल बिडगर, बाळासाहेब बांबळे, गोंविद कुल्लाळ, प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा तथा मंडळ कृषि अधिकारी कोतूळ किरण मांगडे, कृषी सहायक श्रीमती कोरडे, कृषी पर्यवेक्षक राजाराम साबळे, बाळनाथ सोनवणे, कृषी विभागाचे कर्मचारी, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
भाजीपाल्याबरोबरच स्ट्रॉबेरी लागवड करा : लहामटे
• पाचनई येथे पूर्ण झालेल्या ६ शेततळ्यांचे लोकार्पण आमदार लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या शेती पद्धतीला शेतकऱ्यांनी फाटा द्यावा.
• ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करावा, जेणेकरून पाण्याची बचत होईल. शेततळ्याच्या पाण्यावर अधिक उत्पादन घ्यावे. फुलशेती, भाजीपाला या पिकांबरोबर स्ट्रॉबेरी लागवड करावी, असा सल्ला आमदार लहामटे यांनी दिला.