Join us

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; हजारो हेक्टरला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 14:53 IST

कृषि विभागाने दिला मका पिकासाठी या औषधींच्या फवारणीचा सल्ला ..

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात खरीप हंगामात आतापर्यंत १ लाख ४ हजार ३१६ हेक्टरवर पेरणी झाली असून यातील पेरणी झालेल्या ४५ हजार ४५० हेक्टरपैकी हजारो हेक्टर मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांवर नवे संकट ओढावले आहे.

वैजापूर तालुक्यात एकूण पेरणी लायक क्षेत्र १ लाख ३४ हजार ८९४ हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ४ हजार ३१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये यावर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात घट होऊन मका क्षेत्रात वाढ झाली आहे.

आतापर्यंत तालुक्यात ४५ हजार ४५० हेक्टरवर मका पिकाची पेरणी झाली आहे. मका पिकाची उगवण होऊन वाढीच्या अवस्थेत आहे. सुरुवातीच्या काळात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. लष्करी अळीचा जीवनक्रम अंडी, आळी, कोश व पतंग अशा अवस्थेत पूर्ण होतो.

एक पतंग साधारणतः एका रात्रीत शंभर किलोमीटरचा प्रवास करतो. त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी अळी मक्याची पाने खाऊन दिवसा पोंग्यात लपून बसते. ही अळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते, तेव्हा या अळीला वेळीच रोखावे असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

निबोळी अर्काची फवारणी करा

या अळीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी सुरुवातीच्या काळात करावी, तसेच पाण्याची सोय असेल तर तुषार सिंचनचा वापर करावा, म्हणजे पोंग्यात पाणी राहून अळी गुदमरून जाते, तसेच प्रादुर्भाव अधिक असेल तर रासायनिक नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंजोएट ५ एसजी चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी व सोबत निंबोळी अर्कची फवारणी करावी.

जेणेकरून निबोळी अर्क अंडी नाशक व पतंगाला प्रतिरोधक म्हणून काम करेल. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क फवारण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव व तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी केले आहे.

कृषी विद्यापीठाचे शेतकऱ्यांना आवाहन

• रासायनिक किटकनाशकाची फवारणी चारा पिकावर करु नये.

एकाच रासायनिक किटकनाशकाची फवारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करु नये.

तुऱ्याची अवस्था व त्यानंतर फवारणी टाळावी.

फवारणी करताना मजुराने सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.

एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे.

हेही वाचा - ढगफूटी होऊनही शेतात साचले नाही पाणी; बीबीएफ पद्धत शेतकरी बांधवांसाठी ठरतेय वरदान

टॅग्स :मकाशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनखरीपशेती क्षेत्रमराठवाडा