नाशिक : शेतकरीशेतीकामासाठी विविध प्रकारची रसायाने, औषधे व कीटकनाशकांचा वापर करीत असतात. ज्यामुळे काहीवेळा अपघाती विषबाधा व आरोग्यावर दुष्परिणाम जाणवतात. विषबाधा झालेल्या व्यक्तींवर तत्काळ उपचार व सुरक्षितेबाबत प्रशिक्षण महत्वाचे असून जिल्ह्यातील सहाशे आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारूदत्त शिंदे यांनी सांगितले.
आज प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय एस.एम.बी.टी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ॲण्ड रिसर्च सेंटर धामणगाव येथे कृषी आयुक्तालय,पुणे व शिवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली कीटकनाशकांचे दुष्परिणाम, त्यावर उपचार व सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. शिंदे बोलत होते.
या कार्यशाळेत प्रशिक्षक डॉ.पिल्ले यांनी सांगितले की, कीटकनाशक किंवा तत्सम रसायनांच्या अपघातामुळे जगात दरवर्षी दोन लाखांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू होतो. शेतकऱ्यांनी कीटकनाशके फवारताना मास्क, हातमोजे, गॉगल व पादत्राणे वापरणे आवश्यक आहे. त्याबरोबर विषबाधा झालेल्या व्यक्तीला सुरक्षितपणे कसे वाचवावे कोणत्या प्रकारची तत्काळ औषधे व उपाययोजना कराव्यात याची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या प्रशिक्षणामुळे डॉक्टरांमध्ये जनजागृती निर्माण होऊन विषबाधेच्या घटना अधिक कार्यक्षमतेने हाताळू शकतील आणि विषबाधेच्या घटनांमध्ये घट होईल, तसेच रोखता येतील अशी अपेक्षा डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केली.
शिवार हेल्पलाइनला फोन करा
शेतकरी व डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची विषबाधेच्या घटना घडल्यास अथवा प्राथमिक उपाचारासंदर्भात माहिती, सल्ला मार्गदर्शन व मदत आवश्यक असल्यास 8955771115 शिवार हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.
