प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा महामार्ग आहे. काही लोकांनी त्याला विरोध केला असला तरी आम्ही या मार्गाचा नवा प्लॅन तयार केला असून, तो कमीत कमी बागायती शेतीमधून जाणारा असेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत केला.
महापालिका निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत आम्ही आवाहन करणार असून कोल्हापूरकर त्याला प्रतिसाद देतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा महामार्ग आहे हे मी सुरुवातीला समजावून सांगत होतो. त्यावेळी काही शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांना समजले होते ते आमच्यासोबत होते. आता सर्वांच्या ते लक्षात आले असून आम्ही त्याचा नवा मार्ग तयार केला आहे.
नवीन मार्ग कुणी विरोध केला म्हणून तयार केलेला नाही. नवीन ग्रीनफील्ड महामार्ग तयार करताना नवीन एरिया ओपन व्हावेत हा उद्देश आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग व शक्तिपीठ हे दोन्ही मार्ग समांतर होत होते. त्याचा दोन्ही महामार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला असता. यामुळे नवीन परिसराचा यात समावेश होत नव्हता. म्हणून आम्ही नवीन परिसराचा समावेश असणारा मार्ग तयार केला.
यात कमीत कमी बागायती शेती, कमीत कमी जंगल परिसर येईल, या प्लॅननुसार आम्ही शक्तिपीठ महामार्ग नेणार आहोत. यात जिल्हे तेच आहेत, कोणताही जिल्हा बदललेला नाही. काही तालुके व परिसर बदलला आहे. या नवीन प्लॅननुसारच शक्तिपीठ होणार असून यात कोणताही बदल होणार नाही, अशी भूमिकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.
बाहेरच्या परिसराचा चुकीच्या पद्धतीने विकास
• कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत कोल्हापूरकरांनी ठरवायचे आहे. मात्र, कोल्हापूरची हद्दवाढ केलीच पाहिजे, असे स्पष्ट मतही फडणवीस यांनी या मुलाखतीत व्यक्त केले.
• ते म्हणाले, आज कोल्हापूर शहराचा कोंडमारा झाला आहे. बाहेरचा जो भाग आहे तिथे महानगरपालिकेचा अंमल नसल्याने हा भाग चुकीच्या पद्धतीने विकसित होतोय. तेथील बांधकामे, रचना चुकीच्या पद्धतीने होत आहे. म्हणजे येथील परिस्थिती हातातून निघून जाईल, कोल्हापुरात सर्किट बेंच आल्यानंतर ते प्रमुख शहर झाले आहे.
• आधीही हे शहर प्रमुखच होते. पाच जिल्ह्यांतील लोकं रोज तेथे येणार आहेत. त्यामुळे हद्दवाढ कोल्हापूरने केली नाही तर पुढच्या काळात कोल्हापूर शहराचे महत्त्व हळूहळू कमी होईल. त्यामुळे हद्दवाढ केली पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कर कमी केल्याने विरोध होणार नाही
• पूर्वी हद्दवाढ झाली की विकास होण्यासाठी पाच-सहा वर्षे लागत होती, महानगरपालिकेचे कर द्यावे लागत होते. त्यामुळे हद्दवाढीला विरोध होत होता. आता आम्ही ते बदलले असून कमी दराने कर लावतो.
• त्यामुळे ही समस्या आम्ही सोडवली आहे. निवडणुकीनंतर कोल्हापूरकरांना हद्दवाढ करण्यासाठी आवाहन करणार असून, कोल्हापूरकर त्याला प्रतिसाद देतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
