दरवर्षी रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करतात. कारण, वर्षभर पुरेल या पद्धतीने गव्हाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी मशागत करतात. मात्र, रात्री गव्हाला पाणी देत असताना उंदीर, घूस आणि साप आढळून येतात.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पाणी देताना भीतीचे वातारवण असते. या उंदीर, घूस आणि सापाचा बंदोबस्त करण्यासाठी झिंक फॉस्फाइड आणि फुमींगड हे पोंगे (कडकड्या) यास लावून नळ्यात टाकल्यास या प्राण्यांचा नायनाट होतो, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी भरत नागरे यांनी दिली.
या उंदरांच्या उपद्रवामुळे गहू, हरभरा आणि उन्हाळी मका पिकाचे आतोनात नुकसान होत आहे. एवढेच नव्हेतर वन्यप्राण्यांकडून मोठी नासाडी केली जाते.
त्यामुळे अनेक भागांतील शेतकरी रात्री जागलीवर जाऊन पिकांचे संरक्षण करतात, तेव्हा कुठे वर्षभर पुरेल एवढे धान्य घरामध्ये येते, अन्यथा दुर्लक्ष केल्यास उपासमारीची वेळ येईल, असे शेतकरी सांगत आहेत.
शेतामध्ये अनेकवेळा उंदरांनी तयार केलेल्या बिळांमध्ये सापही निघतात. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. त्यामुळे अनेक शेतकरी गव्हाला दिवसा पाणी देणे पसंत करीत असतात.
उंदरांकडून खाणे कमी
गव्हाच्या पिकामध्ये उंदीर जागोजागी बिळे करून ठेवतात. हे प्राणी खाणे कमी आणि नासाडीच अधिक करीत असतात.
फुलांचा फायदा नाही
काही शेतकरी उंदिरांसाठी बेशरम किंवा धोतऱ्यांची फुले तोडून शेतात टाकतात. परंतु, त्याचा काहीच उपयोग होत नाही.
गहू, हरभरा पीक जोमात
सध्या गहू पीक जोमात आले आहे. परंतु, ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे. हरभराही घाटेअळीत असून, त्यावर शेतकरी फवारणी करीत आहेत.
बंदोबस्त कसा करावा?
उंदीर वाढल्यास झिंक फॉस्फाइड आणि फुर्मीगड हे पोंग्यास लावून ते टाकावे.
गहू सोंगणीस आल्यावर उंदरांची संख्या वाढते. त्यासाठी झिंक फॉस्फाइड व फुमींगड हे पोंग्यास लावून नळ्यात टाकायला हवे. - भरत नागरे, मंडळ कृषी अधिकारी जालना.
झिंक फॉस्फाइडचा वापर
झिंक फॉस्फाइड हे अजैविक रासायनिक संयुग आहे. हे एक राखाडी घन आहे, व्यावसायिक नमुने गडद, काळे असतात. हे उंदीरनाशक म्हणून वापरले जाते.
उंदरांना हुसकावणे कठीण
गव्हाच्या शेतात उंदरांची संख्या अधिक झाल्यास त्यांना हुसकावणे कठीण जाते. कारण, गव्हाची नासाडी अधिक होते.