भारतातील एकूण मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होत आहेत. धावपळीची जीवनशैली आणि तणावामुळे 'इस्केमिक' हृदयरोगाचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे.
हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने ओढवणारे हे संकट वेळीच ओळखणे आणि प्रतिबंध करणे आता अनिवार्य झाले आहे. उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता आणि अनुवांशिकता या कारणामुळे इस्केमिक हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे.
काय काळजी घ्याल?
नियमित व्यायाम, संतुलित आहार, रोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे किंवा सायकलिंग करा. आहारात पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करा. आहारात ट्रान्स फॅटसचे प्रमाण शून्यावर आणणे आवश्यक आहे.
काय आहे नेमका 'इस्केमिक' हृदयरोग ?
जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, तेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. या स्थितीला "इस्केमिक हृदयरोग" म्हणतात. यामुळे छातीत दुखणे (अँजायना) किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
कोणत्या वयात सर्वाधिक धोका?
पूर्वी हा आजार ५० वर्षांनंतर दिसायचा, परंतु आता बदलत्या जीवनशैलीमुळे ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आढळत आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हा धोका वाढतो.
'ही' आहेत प्रमुख कारणे
उच्च रक्तदाब आणि मधुमेह, रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन, व्यायामाचा अभाव व मानसिक तणाव ही प्रमुख कारणे आहेत. छातीत सतत जडपणा किंवा कळ येणे, थोडे चालल्यावरही प्रचंड धाप लागणे, डावा हात, मान किंवा जबड्यापर्यंत वेदना जाणे, ही लक्षणे आहेत.
वेळीच 'या' चाचण्या करा
हृदयरोगापासून बचाव करण्याकरीता ईसीजी आणि टू-डी ईको, टीएमटी (ट्रेडमिल टेस्ट), लिपिड प्रोफाइल आणि कोरोनरी अन्जिओग्राफी, आदी चाचण्या वेळीच करणे आवश्यक आहे.
हृदयविकार टाळण्यासाठी शरीराचे वजन आणि पोटाचा घेरा नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. लक्षणे दिसताच घरगुती उपचार न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तरुणांमध्ये वाढते हृदयविकाराचे प्रमाण हे व्यसनाधीनता आणि झोपेच्या कमतरतेमुळे आहे. - डॉ. पवनकुमार गिरी, छातीरोग, हृदयरोग व ॲलर्जीतज्ज्ञ.
Web Summary : Ischemic heart disease is rising due to lifestyle and stress. Early detection is crucial. Risk factors include high cholesterol, blood pressure, and inactivity. Regular exercise, balanced diet are key. Get timely ECG, TMT tests.
Web Summary : भागदौड़ भरी जीवनशैली से इस्केमिक हृदय रोग बढ़ रहा है। समय पर पहचान जरूरी है। उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तचाप जोखिम कारक हैं। नियमित व्यायाम, संतुलित आहार लें। ईसीजी, टीएमटी परीक्षण कराएं।