जयेश निरपळ
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ लाख ८५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने याकरिता ५६० कोटी रुपये मंजूर केले असून, ज्या शेतकऱ्यांकडे 'फार्मर आयडी' आहे, त्यांच्या खात्यावर पुढील आठवड्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.
मात्र, जिल्हा प्रशासनाने मागील चार महिन्यांपासून वारंवार आवाहन करूनही, ज्या जवळपास १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांनी अद्याप आपला 'फार्मर आयडी' काढलेला नाही. त्यांना आता अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ६ लाख ८५ हजार शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर ५६० कोटी रुपये आयडी अनुदान जमा होणार आहे; मात्र ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही.
त्यांना नव्याने काढण्याच्या सूचना प्रशासनाने यापूर्वीच केल्या होत्या, फार्मर आयडी तयार नसल्यास लाभार्थी यादीमध्ये नाव जाणार नाही, तोपर्यंत संबंधितांना अनुदानाची वाटच पाहावी लागणार आहे.
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय ॲग्रिस्टॅकबाबतची सद्य:स्थिती
| तालुका | शेतकरी | नोंदणी | प्रलंबित | टक्केवारी |
| छ. संभाजीनगर | ७९,४९३ | ४६,१०२ | ३३,३९१ | ५८% |
| गंगापूर | ७६,२०७ | ६३,२७२ | १२,९३५ | ८३.०३% |
| कन्नड | ९८,६५० | ७३,२३४ | २५,४१६ | ७४.२४% |
| खुलताबाद | २४,७९१ | २१,५४६ | ३,२४५ | ८६.९१% |
| पैठण | ९४,१७२ | ६५,२६२ | २८,९१० | ६९.३०% |
| फुलंब्री | ५५,४७७ | ४०,८३५ | १४,६४२ | ७३.६१% |
| सिल्लोड | ७३,३१० | ७२,४१८ | ८९२ | ९८.७८% |
| सोयगाव | ३०,२८० | २४,०७३ | ६,२०७ | ७९.५०% |
| वैजापूर | ९८,६९८ | ९०,८७६ | ७,८२२ | ९२.०७% |
| एकूण | ६,३१,०७८ | ४,९७,६१८ | १,३३,४६० | ७८.८५% |
अनेकांकडे नाही ॲग्रिस्टॅक क्रमांक
शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, ॲग्रिस्टॅक आयडी असेल, तर कुठल्याही प्रकारची ई-केवायसीची गरज नाही. अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे; परंतु अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल त्यांनी सीएससी सेंटरमध्ये जाऊन ॲग्रिस्टैंक नंबर काढून घेणे आवश्यक आहे.
केवायसी नाही फार्मर आयडीच हवा
आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीचे अनुदान आल्यास शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घ्यावी लागत होती; परंतु आता केंद्रीयस्तरावरून प्रत्येक शेतकऱ्यास ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी दिला जात आहे. शेतकऱ्यांना वारंवार ई-केवायसीची प्रक्रिया करावी लागू नये, यासाठी व इतर उद्देश ठेवून ॲग्रिस्टॅक प्रोजेक्ट राबविला जात आहे.
