Join us

ऊस तोडीसाठी पैसे मागितले तर बिलातून कापून शेतकऱ्याला देणार; या कारखान्यांनी काढली पत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:30 IST

'लोकमत'ने गेली पाच दिवस प्रसिद्ध केलेल्या उसाच्या फडावर खंडणीचा कोयता' या वृत्तमालिकेचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत करत खंडणीखोरांना अद्दल घडविण्याचा निश्चय केला आहे.

शरद यादवकोल्हापूर : 'लोकमत'ने गेली पाच दिवस प्रसिद्ध केलेल्या उसाच्या फडावर खंडणीचा कोयता' या वृत्तमालिकेचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत करत खंडणीखोरांना अद्दल घडविण्याचा निश्चय केला आहे.

त्याची सकारात्मक दखल सर्वच साखर कारखान्यांनी घेतली असून जर का तोडीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्याची तक्रार आली तर संबंधित तोडणी, वाहतूकदाराच्या बिलांतून पैसे कापून ते शेतकऱ्यांना परत देण्याचे दरडावले आहे.

आता गरज आहे शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रार करण्याची, 'शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात' असे म्हणन चालणार नाही शेतकऱ्यांनी स्वत: शिवाजी होऊन खंडणीचा कॅन्सर मुळासकट उपटून फेकून द्यायची तयारी दाखवावी.

खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरु असताना साखर कारखानदार, प्रशासन शांत कसे बसते, याचा जाबही आम्ही विचारला होता. याला अनुसरून साखर कारखान्यांनी पत्रक काढून एक पाऊल पुढे टाकले आहे.

याबाबत कारखाना सुरू होताच शाहू, कागल व दत्त शिरोळ या कारखान्यांनी पत्रक काढून तक्रार देण्याचे आवाहन केले होते. आता सर्वच कारखान्यांनी शेतकऱ्यांना याबाबत आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी आमची लूट होते, असे म्हणत बसण्याला काहीही अर्थ नाही. शोषणाविरुद्ध आवाज उठविण्याची हीच संधी आहे. अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही.

'लोकमत' शेतकऱ्यांचे व्यासपीठखंडणीबाबतची मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून प्रतिक्रियांचा पाऊस पडला. सोशल मीडियावर गेले पाच दिवस 'लोकमत'चीच चर्चा असल्याचे दिसून आले. एखाद्या बातमीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टेटस ठेवण्याची ही दुर्मीळ बाब प्रकषनि दिसून आली. मालिकेतून शेतकऱ्यांच्या जगण्यावर दाहक प्रकाश टाकल्याबद्दल शेतकरी, साखर उद्योगातील तज्ञ, कामगार, नोकरदारांनी लोकमत'चे त्रिवार अभिनंदन करत परिवर्तनाची ही लढाई नेटाने सुरू ठेवण्याचा आग्रह केला, खंडणीच्या किडीवर औषध मारून खुशाली हद्दपार करण्याचा निर्धार अनेकांनी 'लोकमतकडे बोलून दाखविला.

खंडणी रोखण्याचा 'शिरोळ पॅटर्न राबवावा..शिराळमध्ये गुरुवारी कारखानदार, संघटना व साखर उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. यावेळी कारखान्याचे शेती अधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी व प्रादेशिक साखर कार्यालयाचा प्रतिनिधी यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप करायचे ठरले. खुशालीबाबत शेतकऱ्याऱ्यांनी शेतकरी संघटनांकडे तक्रार करावी. संघटनांचे प्रतिनिधी ही माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकतील. यानंतर संबंधित कारखान्याचा शेती अधिकारी त्या शेतकऱ्याला जाऊन विचारणा करून शहानिशा करेल व तोच पुरावा ग्राह्य मानून तोडणी, वाहतूकदाराच्या बिलातून पैसे कापून ते शेतकऱ्याला परत करतील. हा पॅटर्न जिल्ह्यात सगळीकडेच रूढ होण्याची गरज आहे.

या कारखान्यांनी काढले पत्रकशाहू कागल, दत्त शिरोळ, दूधगंगा बिद्री, सदाशिवराव मंडलिक हमिदवाडा, तात्यासाहेब कोरे वारणानगर, शरद नरंदे, वसंतराव देसाई आजरा, संताजी घारेपडे काळम्मा बेलेवाडी, आवाडे जवाहर हुपरी, पंचगंगा इचलकरंजी, गुरुदत्त टाकळीवाडी, अथणी बांबवडे, नलवडे कारखाना गडहिंग्लज, भोगावती परिते या कारखान्यांनी पत्रक काढले आहे.

शेतकऱ्याचे सगळ्या घटकांनी लचके तोडण्याचा प्रकार म्हणजे खुशाली. याला जर कायमची मूठमाती द्यायची असेल तर संघटनांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे तरच शेतकरी वाचेल. आम्ही आंदोलन अंकुशच्या वतीने खुशाली अजिबात खपवून घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. प्रशासन, कारखाने यांना सोबत घेऊन यावर उत्तर काढायला सुरुवात केली आहे. हाच पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविला तरच बळीराजाला सुखाचे दिवस येतील. - धनाजी चुडमुंगे. आंदोलन अंकुश संघटना

अधिक वाचा: Sugarcane Harvesting : ऊसतोड खंडणीचा पाडू कंडका; खडसावून सांगा खुशाली देणार नाही

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीपीककोल्हापूरमहाराष्ट्रशेतीकामगार