Pune : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयाच्या (ICAR–DFR) स्थापनेला १६ वर्षे पूर्ण झाले आहेत. या संस्थेचे मुख्य कार्य हे फुल शेतीमध्ये उत्पादकता आणि आर्थिक महत्त्व वाढवण्यासाठी पुष्पविज्ञान (Floriculture) क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञान विकास करणे, नवीन जाती विकसित करणे, मूल्यवर्धित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणे, परागीभवन करणाऱ्या प्रजातींचे संरक्षण करणे आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व विस्तार सेवा देणे हे आहे.
दरम्यान, पुण्याच्या पूर्वेकडील हडपसर परिसरात असलेल्या पुष्प विज्ञान संशोधन संचालनालयाने आत्तापर्यंत फुलशेती संशोधन, पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन, उच्च मूल्य फुलझाडांच्या जातींची निर्मिती आणि शाश्वत शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. यंदा १६ व्या स्थापना दिनानिमित्त “शेतीमध्ये कृषी रसायनांचा संतुलित वापर: पर्यावरण व शेतीकामगारांची सुरक्षा” या विषयावर जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया, नई दिल्ली यांच्या सहकार्याने आयोजित केली जात असून, या कार्यक्रमात २०० हून अधिक शेतकऱ्यांना ‘वनस्पती संरक्षण सुरक्षा किट’ वितरण करण्यात येणार आहे.
दुपारच्या सत्रात “मसुदा बीज विधेयक २०२५: फुलशेती क्षेत्रासाठी संधी आणि परिणाम” या विषयावर विचारमंथन सत्र आयोजित केले जाईल. यामध्ये नियम, धोरण बदल आणि फुलशेती व्यवसायासाठी असलेल्या संधींवर सखोल चर्चा होणार असून शेतकरी, उद्योजक आणि हितधारकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ICAR–DFR चा स्थापना दिवस हा संशोधक, धोरणकर्ते, उद्योग व शेतकरी या सर्वांसाठी संवाद आणि सहकार्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग होणार असून, फुलशेती क्षेत्रात ज्ञानवृद्धी आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आदान–प्रदानासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.
पर्यावास पुनर्स्थापन कीट
काही महिन्यापूर्वी या संस्थेने फुलझाडांमध्ये परागीभवन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून 'परागकण अधिवास पुनर्स्थापन किट' तयार केली आहे. या माध्यमातून फुलझाडांची उपलब्धता वाढवून परागीभवनाचे काम करणाऱ्या किटकांना योग्य अधिवास तयार करण्यावर भर देण्यात आलाय. यामध्ये १५३ हून अधिक कीटकांचा आणि फुलझाडांचा अभ्यास करून ही किट डिझाईन करण्यात आली आहे. या किटचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे.
