रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी १० हजार रुपयांची मदत जमा करणे सुरू आहे. मात्र, या मदतीचा लाभ मिळाल्याचा आनंद एका रात्रीतच विरला.
चंद्रपूर जिल्ह्याच्या कोठारी (ता. बल्लारपुर) येथील शेतकरी युवराज तोडे यांच्या बाबतीत मंगळवारी (दि. ११) घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
युवराज तोडे यांच्या नावावर एकूण आठ एकरपेक्षा जास्त शेती असून, यापूर्वी अतिवृष्टीची मदत मिळाली होती. रब्बी हंगामासाठी शासनाने हेक्टरी १० हजारांची मदत करण्याची व मर्यादा तीन हेक्टर असणार असल्याची घोषणा केली.
त्यानुसार ११ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या बँक खात्यात तीन हेक्टर मर्यादेसाठी ३० हजार रुपये जमा झाल्याचा संदेश आला. मात्र, १२ नोव्हेंबरच्या सकाळी ती संपूर्ण रक्कम खात्यातून परत घेतल्याचा संदेश मोबाइलवर पाठविण्यात आला. ही रक्कम परत का घेतली, कारण त्यांना अद्याप कळले नाही.
याबाबत त्यांनी कृषी विभागाला माहिती दिली. यापूर्वी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी १८ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ ८ हजार ५०० रुपयांचीच मदत देण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून मदतीची रक्कम पुन्हा बँकेत जमा करण्याची मागणी शेतकरी युवराज तोडे यांनी केली आहे.
