lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > सुधारित तंत्राने शेवग्याची लागवड कशी कराल ?

सुधारित तंत्राने शेवग्याची लागवड कशी कराल ?

How to cultivate drumstick with improved technique? | सुधारित तंत्राने शेवग्याची लागवड कशी कराल ?

सुधारित तंत्राने शेवग्याची लागवड कशी कराल ?

तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड सुरु झालेली आहे. शिवाय बाजारपेठेत माल पाठविताना इतर भाजीपाल्या प्रमाणे विशेष खर्चिक पॅकींग लागत नाही

तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड सुरु झालेली आहे. शिवाय बाजारपेठेत माल पाठविताना इतर भाजीपाल्या प्रमाणे विशेष खर्चिक पॅकींग लागत नाही

शेअर :

Join us
Join usNext

शेवग्याच्या शेंगा ग्रामीण भागातील लोकांप्रमाणे शहरवासी सुध्दा आवडीने नेहमीच्या आहारात वापरतात म्हणुन शेवग्याच्या शेंगाला कायमस्वरूपी मागणी आहे. तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड सुरु झालेली आहे. शिवाय बाजारपेठेत माल पाठविताना इतर भाजीपाल्या प्रमाणे विशेष खर्चिक पॅकींग लागत नाही. तसेच बाजारपेठेत पोहचेपर्यंत माल खराब होत नाही. शेवग्याच्या पानांची भाजी व फुलांची कोशिंबीरही करतात.

शेवग्याच्या शेंगात व पानात अ आणि क ही जीवनसत्वे तसेच चुना (कॅल्शियम), लोह व प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांतील बियांपासून तेल काढतात या तेलाचा उपयोग सांधेदुखीवर सुध्दा होतो. या तेलालाच बेन ऑईल असे म्हणतात. पिण्याचे पाणी स्वच्छ करण्याकरिता शेवग्याच्या शेंगांतील बियांची पावडर अत्यंत उपयुक्त आहे. शेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर आयुर्वेदिक औषधात केला जातो.

जाती :
शेवग्यामध्ये फारशा जाती उपलब्ध नाहीत. परंतु, अनेक खेडयांमध्ये आणि विभागात वाढणाऱ्या झाडांमध्ये चव व रंग याबाबत विविधता आढळते. चांगली शेंग म्हणजे शेंगांची लांबी ५० ते ६० सें.मी. असावी. त्यात भरपूर गर असावा. कडवट चव असणाऱ्या शेवग्यास भाव मिळत नाही. शेंगा काढल्यानंतर त्याचा तजेला २-३ दिवस टिकून रहावा. बऱ्याच वेळा शेंगा लवकर पोचट होतात. तसेच दोन्ही हंगामात भरपूर शेंगा देणारे असे एखादे झाड निवडावे. अशा झाडाचे फाटे वापरुन लागवड केली असता चांगले उत्पादन देणारा वाण मिळू शकतो.

शेवगा बहुपयोगी असला तरी यावर विशेष असे संशोधन न झाल्यामुळे हे पीक काहीसे दुर्लक्षित राहिलेले आहे. सध्या तामिळनाडू कृषि विद्यापीठ, कोईमतूर या संस्थेने कोईमतूर- १, कोईमतूर- २, पि.के.एम.- १ आणि पी.के.एम.-२ या लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असलेले वाण प्रसारित केलेले आहेत. तसेच कोकण कृषि विद्यापीठाने कोकण रुचिरा वाण प्रसारित केलेला आहे. या जातीचे झाडे ५ ते ६ मीटर उंच असून झाडास १६ ते २२ फांद्या असतात तसेच बागलकोट (कर्नाटक) येथील विद्यापीठाने भाग्या  ही जात चांगल्या उत्पादनासाठी विकसीत केली आहे.

हवामान व जमीनः
शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे अशा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो. कोकणातील शेवगा तर केवळ पावसावरच येतो. पश्चिम महाराष्ट्रातही शेवग्याची लागवड होते. परंतु अशा जमिनीत झाडे कोरडवाहूच आढळतात. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील भारी काळ्या जमिनीतही शेवग्याची लागवड होते. परंतु अशा जमिनीत झाडे उंच वाढतात. पानांची वाढ जास्त, ताण चांगला बसत नाही. त्यामुळे फुलांचे आणि शेंगांचे प्रमाण कमी होते.

लागवड:
व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड करावयाची असल्यास पावसाच्या पूर्वी ६० से. मी. लांब, रुंद आणि खोल खड्डे घ्यावेत. खड्ड्यांमध्ये चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५:१५:१५ (२५० ग्रॅम) आणि ट्रायकोडर्मा प्लस पावडर ५० ग्रॅम टाकावी अशा प्रकारे खड्डा भरुन घ्यावा. लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३.० मीटर ठेवावे. शेवग्याची अभिवृध्दी फाटे कलम व बियापासून रोपे तयार करुन केली जाते.

लागवडीचा हंगामः
कमी पावसाच्या प्रदेशात (खरीपात ) जून-जुलै मध्ये पहिल्या पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो. हवेतील आर्द्रता वाढते. अशी हवा फाटे कलम फुटण्यास किंवा रोपे रुजण्यास अनुकूल असते. तेव्हा याचवेळी लागवड करावी. फाटे कलम अथवा रोपे लावल्यावर त्याच्या जवळील माती पायाने चांगली दाबावी व हातपाणी द्यावे.

पाणी व्यवस्थापन:
लागवडीनंतर ६ ते ८ महिने गरज पडेल तेव्हा पाणी देवून झाडे जगवावी किंवा झाडाच्या प्रत्येक खड्डयात २ ते ३ लीटर पाणी बसेल अशा क्षमतेचे मडके जमिनीत गळ्यापर्यंत गाडावे व त्यामध्ये ५-६ दिवसाच्या अंतराने पाणी टाकावे. मडक्याच्या तळाशी लहान छिद्र असावे आणि त्यात कापडाची लहान चिंधी घातलेली असावी. यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा सुध्दा वापर करता येईल. झाडे मोठी झाल्यावर पाण्याची गरज भासत नाही.

आंतरपीक:
आंतरपीक म्हणूनही शेवगा पीक घेता येते. कलमी आंबा, चिकू, सिताफळ, आवळा, जांभूळ, फणस व गावठी आंबा यांच्या झाडांमधील भागात पहिले ५-६ वर्ष आंतरपीक म्हणून शेवगा घेता येतो.

लागवडीनंतर घ्यावयाची काळजी:
शेवगा लागवडीनंतर आवश्यक महत्वाच्या बाबी म्हणजे आंतरमशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडाची योग्य छाटणी या बाबींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त आंतरमशागत करावी लागत नाही. तरीसुध्दा झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावीत. तसेच दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते.

खत व्यवस्थापन:
शेवग्याला प्रतिवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरुवातीस १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१२ ग्रॅम सुफर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्यूरेट ऑफ पोटॅश) द्यावे.

छाटणी व्यवस्थापन:
शेवग्याचे झाडे झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थित आकार दिला नाही तर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणी अवघड जाते. यासाठी लागवडीनंतर दोन ते अडिच महिने किंवा मुख्य खोड ३ ते ४ फुट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी. यावेळी खोड जमिनीपासून १ मीटर अंतरावर छाटावे आणि चार दिशाला चार फांद्या वाढू द्याव्यात. झाडांची उंची कमी होवून शेंगा काढणे सोपे जाईल. त्यानंतर ३-४ महिन्यांनी चारीही फांद्या मुख्य खोडापासून एक मीटर अंतरावर छाटाव्यात. त्यामुळे झाडाचा मुख्य आराखडा तयार होईल व झाडांची उंची कमी होवून शेंगा काढणे सोपे जाईल व उत्पादन वाढेल. पुढे झाड जसेजसे जुने होईल तसतसे दर दोन वर्षानी एप्रिल-मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल.

डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. मनोज गुंड आणि डॉ. प्रेरणा भोसले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगांव, जि. अहमदनगर
०२४२६-२४३२४९ 

 

Web Title: How to cultivate drumstick with improved technique?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.