Join us

राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या पगारात किती रुपयांनी वाढ? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:21 IST

sakhar kamgar राज्यातील साखर कारखाना कामगारांना दहा टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली होती.

राज्यातील साखर कारखाना कामगारांना दहा टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी त्रिपक्षीय समिती नेमण्यात आली होती.

या बैठकीत साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार संघटना प्रतिनिधी आणि राज्य सरकार प्रतिनिधी यांच्या प्रतिनिधींमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या निर्णयामुळे राज्यातील दीड लाख कामगारांना फायदा मिळणार आहे. या कामगारांचे वेतन २६०० ते २८०० रुपयांनी वाढणार असून, साखर उद्योगावर ४१९ कोटींचा बोजा पडणार आहे. साखर संकुलमध्ये बुधवारी (दि. २३) ही बैठक झाली.

त्रिपक्षीय समितीची ही पाचवी बैठक होती. यावेळी समितीचे अध्यक्ष तथा राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, सदस्य दिलीपराव देशमुख, प्रकाश आवाडे उपस्थित होते.

तसेच साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, समितीचे सचिव रविराज इळवे, माजी आमदार प्रकाश सोळंके, कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष राऊ पाटील, कामगार महासंघाचे अध्यक्ष पी. के. मुडे, सरचिटणीस आनंदराव वायकर उपस्थित होते.

राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठीच्या यापूर्वीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ ला संपली होती. 'कामगारांना चाळीस टक्के वेतनवाढ द्यावी, असा प्रस्ताव कामगार संघटनांनी समितीच्या पहिल्या बैठकीत दिला होता.

त्यावर कारखान्यांच्या वतीने चार टक्के वाढीचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानंतर चौथ्या बैठकीत कारखाना प्रतिनिधी ७ टक्क्यांवर, तर कामगार संघटना १८ टक्के वेतनवाढीवर ठाम राहिल्या.

त्रिपक्षीय समितीमध्ये तोडगा निघत नसल्याने याप्रश्नी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा लवाद स्थापन करण्याचा निर्णय एकमताने घेतला. शरद पवार यांच्या सूचनेनुसार दहा टक्के वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

साखर कामगारांच्या करारातील यानुसार आहेत तरतुदी◼️ दहा टक्के वेतनवाढ १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९ पर्यंत लागू.◼️ वेतनवाढीचा दीड लाख कामगारांना लाभ होणार आहे.◼️ राज्यातील साखर कारखान्यात कार्यरत असणाऱ्या अकुशल ते निरीक्षक अशा १२ वेतनश्रेणीत कामगारांना २,६२३ ते २,७७३ रुपये वेतनवाढ होणार.◼️ धुलाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, महागाई भत्ता या वाढीचा समावेश साखर कामगारांच्या वेतनात करण्यात आल्यानुसार १० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.

अधिक वाचा: ऊसदर नियंत्रण बैठक झाली; एफआरपी व इतर ऊस प्रश्नांविषयी काय चर्चा? वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीकामगारराज्य सरकारसरकारमहाराष्ट्रआयुक्तशरद पवारपुणे