रेशन कार्डधारकांच्या मोबाइलवर आता धान्याचा हिशेब थेट एसएमएसद्वारे मिळण्यास सुरू झाले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना ही माहिती मोबाइलवर पाठवली जात आहे.
या सुविधेची नुकतीच सुरुवात झाली असून, पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. नोव्हेंबरमधील धान्य वाटपासंबंधी अनेक लाभार्थ्यांना असे एसएमएस आले आहेत.
या मेसेजमध्ये धान्याचा कोटा स्पष्टपणे नमूद केला आहे. त्यामध्ये ज्वारी, गहू आणि तांदूळ या धान्य प्रकारांचा प्रत्येक लाभार्थ्याला किती किलो वाटा मिळाला आहे, हे दिलेले आहे.
आदेशानुसार हा कोटा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भारत सरकारच्या पूर्णपणे निःशुल्क दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. धान्य घेतल्यानंतर पावती घेणे बंधनकारक असल्याचेही संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२४९५० आणि १९६७ उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. या सोयीमुळे रेशनचा व्यवहार अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
'मेरा रेशन' अॅपही उपयुक्त
जर काही कारणास्तव एसएमएस प्राप्त झाला नाही, तर 'मेरा रेशन' या अॅपवर आधार क्रमांक वापरून धान्याचा कोटा तपासता येतो. मंजूर धान्य आणि प्रत्यक्ष दिलेल्या धान्यातील फरक ओळखण्यात हे अॅप उपयोगी पडते.
मोबाइल नंबर जोडणे अनिवार्य
◼️ मोबाइलवर एसएमएस मिळवण्यासाठी रेशन कार्डशी मोबाइल क्रमांक जोडणे आवश्यक आहे.
◼️ त्यानंतर येणाऱ्या महिन्या किती व कोणते धान्य मिळणार आहे याची माहिती मिळेल.
◼️ मात्र, काही ठिकाणी चुकीचे एसएमएस येण्याच्या तक्रारी आल्याने पुरवठा विभागाने याबाबत तपास सुरू केला आहे
ग्राहकांना माहिती मिळाल्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल. अजूनही प्रणालीच्या अपडेशनचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना चुकीचे एसएमएस येत आहेत. चुकीचा मेसेज आल्यास पुरवठा विभाग किंवा दुकानदारांशी संपर्क साधावा. - विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशन
अधिक वाचा: पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केल्यास टॅक्स लागतो की नाही? जाणून घ्या सविस्तर
