देशभरात उसाचे गाळप वेगाने सुरू असून आतापर्यंत १९३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात २०६ सहकारी व खासगी कारखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ७९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.
पुढील दोन महिन्यांच्या काळात आणखी ३० लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकते, असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र व कर्नाटकमधील गाळप हंगाम मार्चअखेर संपण्याची शक्यता असून उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम मे अखेरपर्यंत चालेल.
त्यानुसार देशभरात ३०० ते ३१५ लाख टन साखर उत्पादित होऊ शकेल, असा अंदाजही महासंघाने व्यक्त केला आहे.
देशभरात नोव्हेंबरच्या दरम्यान सुरु झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत २ हजार २१९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
यातून १९३ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या साखर हंगामाचा विचार करता याच दिवसाच्या अखेरीस १ हजार ८५६ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले होते.
त्यातून ८.९० टक्के साखर उताऱ्यानुसार १६५ लाख टन साखर उत्पादित झाली होती. यंदा आतापर्यंत ९.११ टक्के साखर उतारा मिळाला आहे.
सध्या देशभर साखर उतारा चांगला मिळत आहे. राज्यातही आतापर्यंत ९.१० टक्के साखर उतारा मिळाला आहे. राज्यात २०६ सहकारी व खासगी कारखाने सुरू असून त्यांनी आतापर्यंत ८६७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
यातून ७८.९५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या वर्षाच्या साखर हंगामाचा विचार करता १९३ कारखान्यांनी ६१६ लाख टन उसाचे गाळप केले होते. त्यातून ५५.५५ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
अतिरिक्त ३५ लाख टन साखर इथेनॉलसाठी वळवणार
◼️ राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या मते हंगाम मार्चअखेरीस संपेल.
◼️ कर्नाटकातही साखर हंगाम मार्चअखेरपर्यंत सुरू राहील. उत्तर प्रदेशात हंगाम मेअखेरपर्यंत सुरू राहील.
◼️ त्यामुळे देशभरात ३०० ते ३१५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
◼️ अतिरिक्त ३५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यात येणार आहे.
◼️ त्यामुळे एकत्रित साखर उत्पादन ३३५ ते ३५० लाख टन होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देण्यात आली.
अधिक वाचा: भोगावती साखर कारखान्याने डिसेंबरअखेरचे ऊस बिल केले जमा; उसाला दिला राज्यात उच्चांकी दर
