आज जोतिबाची चैत्री यात्रा. भाविकांनी परिसर फुलून गेलाय. या यात्रेचा अविभाज्य भाग असलेला सुगंधी दवणा जोतिबाच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे आणि केखले येथून जोतिबाच्या चरणी वाहण्यासाठी बाजारपेठेत दाखल झाला आहे.
कस्तुरीच्या सुगंधासारखा दवणा खरे तर श्रद्धेचा भाग असल्याने केखले आणि पोहाळ्याचे शेतकरी नगदी पीक म्हणून याकडे पाहत नाहीत. जोतिबाच्या मंदिरात दवण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचा घेतलेला हा आढावा..
शेतकऱ्यांच्या पिढ्यान् पिढ्या जोतिबाच्या सेवेत अर्पण करण्यात येणाऱ्या या सुगंधी वनस्पती दवण्याची लागवड करतात. त्यासाठी सलग पाच ते सहा महिने कष्ट घ्यावे लागतात.
साधारण सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस हे पीक घेतले जाते. या काळात खूप थंडी असते. या थंडीत एखादेवेळेस पाऊस पडला, तर मेहनत वाया जाण्याची शक्यता असते.
हा सुगंधी दवणा काही ठरावीक भागातीलच शेतात येतो. दवण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे तयार होणारे बी पुढील पेरणीसाठी विशेष नैसर्गिक प्रक्रिया करून गाडग्यात ठेवावे लागते.
पोहाळे व केखले या दोन्ही गावांत मिळून पन्नास एकर क्षेत्रावर दवण्याची लागवड केली जाते. या शेतीचे सर्वांत मोठे तांत्रिक वैशिष्ट्य म्हणजे, ज्या जमिनीत एकदा दवणा पीक घेतले की, त्या जमिनीत पुढील तीन वर्षे पुन्हा हे पीक घेता येत नाही.
जमिनीतील विशिष्ट पोषक तत्त्वे हे पीक मोठ्या प्रमाणात शोषून घेत असल्याने शेतकऱ्यांना पिकाची फेरपालट करावी लागते. त्याच कारणामुळे केखलेच्या दवण्याला एक वेगळीच 'कस्तुरी' प्राप्त झाली असून, त्याचा दीर्घकाळ टिकणारा सुगंध सरस ठरतो.
केखले येथील शेतकऱ्यांसाठी दवणा हे केवळ नगदी पीक नसून ती सेवा आहे. थंडीच्या प्रारंभाला झालेली लागवड आणि उन्हाळ्याचे चटके सोसून तयार झालेला हा दवणा आता पूर्ण बहरला आहे. सुमारे १५ ते २० एकर क्षेत्रांवर पसरलेले हे सुगंधी शिवार पाहून मन प्रसन्न होते.
घराघरांत पसरतोय सुगंध◼️ प्रथेप्रमाणे सुगंधी वनस्पती असलेल्या दवण्याचे गुढीपाडव्यादिवशी मंदिरात आगमन होते.◼️ मात्र, जोतिबाच्या मुख्य यात्रेच्या दिवशी प्रत्येक भाविकाच्या हातात 'प्रसादाचा दवणा' पाहायला मिळतो.◼️ देवाच्या चरणी अर्पण करून दवणा घरी नेण्याची परंपरा भाविकांनी जपली आहे.◼️ गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीने न्हाऊन निघणाऱ्या दख्खनचा राजा आणि भक्तांच्या श्रद्धेचा सुगंध असलेला दवणा चैत्र यात्रेच्या निमित्ताने घराघरांत पोहोचून घर सुगंधाने भारून जाते.
जमिनीचा कस आणि निसर्गाचे चक्र◼️ पोहाळे व केखले गावांतील काही कुटुंबे आजही या पारंपरिक शेतीवर उपजीविका करीत आहेत.◼️ या सुगंधी पिकावर जर शास्त्रीय संशोधन झाले आणि त्यावर एखादा प्रक्रिया उद्योग स्थानिक पातळीवर सुरू झाला, तर गावातील सुशिक्षित तरुणांना शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही.◼️ कस्तुरीसारखा सुगंधी वारसा जगासमोर यावा याकरिता स्वतंत्र पेटंटसाठी देवस्थान समिती व जिल्हाधिकारी यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
- नितीन भगवानपन्हाळा
अधिक वाचा: २०१७ च्या कर्जमाफीतील उर्वरित शेतकऱ्यांना ५०० कोटींचा निधी आला; कधी सुरु होणार वाटप?
Web Summary : Fragrant Davana, integral to Jotiba's Chaitra Yatra, is cultivated in Pohale and Kekhale. Farmers dedicate fields to this crop, requiring months of labor. The unique farming practice involves crop rotation due to nutrient depletion. The aroma fills homes during the festival, with calls for research and patents.
Web Summary : जोतिबा की चैत्र यात्रा के लिए सुगंधित दवना पोहाले और केखले में उगाया जाता है। किसान महीनों की मेहनत से इसे तैयार करते हैं। पोषक तत्वों की कमी के कारण फसल चक्रण आवश्यक है। त्योहार के दौरान इसकी सुगंध घरों में फैल जाती है, अनुसंधान और पेटेंट की मांग की जा रही है।