Join us

माठातील पाणी कसे थंड होते? व त्याचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 10:53 IST

सध्या उन्हाळा ऋतू सुरू आहे. उन्हाळा एवढा तीव्र झाला आहे की, झाडाच्या सावलीत ही माणूस उकाड्याने हैराण होत आहे.

सध्या उन्हाळा ऋतू सुरू आहे. उन्हाळा एवढा तीव्र झाला आहे की, झाडाच्या सावलीत ही माणूस उकाड्याने हैराण होत आहे.

या उकाड्याने हैराण झालेला माणूस पहिल्यांदा घरी जाऊन काय करत असेल तर तो 'रेफ्रिजरेटर' मधील पाणी किंवा कोल्ड्रिंक्स सहजपणे पितो.

या अगोदर वीस-पंचवीस वर्षे जर मागे गेलो तर त्याकाळी ग्रामीण व शहरी भागांमध्ये माठाचा वापर जास्त प्रमाणात केला जायचा. आत्ताच्या पिढीला 'माठ' म्हणजे काय? हा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देणं अवघड आहे.

कारण माठ म्हणजे मडकं फक्त त्यांनी चित्रातच पाहिलेल आहे आणि हो! आजच्या या पिढीला फक्त 'फ्रिज' हेच साधन थंड पदार्थ ठेवण्यासाठी वापरले जाते एवढेच माहीत आहे.

'माठ' या शब्दाचे तीन अर्थ आहेत माठ म्हणजे पालेभाजी, गार पाणी करण्याची हंडी, मंद बुद्धीचा मुलगा. पण या लेखात आपण माठ म्हणजे मडके, मटका, सुरई याचे महत्त्व पाहणार आहोत.

पूर्वीच्या काळी मकर संक्रांत सण येण्याच्या अगोदर छोटी छोटी मडकी कुंभार बनवत असे व दारोदारी विकत असत. ही मडकी 'सुगड' म्हणून मकर संक्रांतीला लोक खरेदी करायचे.

मकर संक्रांतीला हे सुगड पूजल्यानंतर त्याचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी लोक करायची. दही, लोणी, ताक हे पदार्थ नैसर्गिकरीत्या थंड ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे साधन होते. त्यातील नैसर्गिक घटक, पोषक घटक आपल्याला या माठातून मिळत असत.

पूर्वीच्या काळी पाणी साठवण्यासाठी मातीची भांडी वापरण्याचे प्राथमिक कारण म्हणजे नैसर्गिकरीत्या पाणी थंड ठेवण्यास माठ मदत करते. माठाचे महत्त्व म्हणजे हे भांडे सच्छिद्र अशा स्वरूपाचे असते बाष्पीभवन प्रक्रिया जलद होते.

परिणामी पाण्यावर नैसर्गिक थंड प्रभाव पडतो. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात या माठाच्या रूपाने रोजगार मिळत होता मडके तयार करणाऱ्यांचे पोट याच्यावर भरले जायचे.

आज मात्र माणूस शांतता समाधान मिळवण्यासाठी शहरातून गावाकडे येताना दिसतो. पण त्याच्या पुढ्यात असलेल्या नैसर्गिक स्रोतांचा त्याला विसर पडायला लागला आहे.

आजही आपल्या माठात ठेवलेले दही, लोणी, ताक, कुल्फी, सरबत विकणारा माणूस दिसला तर मन कसे प्रफुल्लित होते. आपण त्याच्याकडे या वस्तू खरेदी कराव्यात अशी आपली इच्छा निर्माण होते.

हीच इच्छा आपल्याला नैसर्गिक जीवन जगण्याकडे घेऊन जात आहे. 'गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी' असे होऊ नये यासाठी पुन्हा निसर्गामध्ये तयार झालेल्या या माठातील पाणी पिऊया व आपले जीवन आनंददायी व आरोग्यदायी बनवूया!

नाहीतर या कवितेच्या ओळी मला आठवतात ये ग ये ग सरी! माझे मडके भरी! सर आली धावून! मडके गेले वाहून! हे मडके म्हणजेच माठ कायमचेच कालबाह्य होणार नाही याची आपण काळजी घेऊया!

पोषणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार- मातीच्या भांड्यातून थंड केलेले पाणी पिणे हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत.. माठातील पाण्याचे तापमान आदर्श असल्याने ते पचण्यास मदत करते. त्यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता या समस्या टाळता येतात.- आयुर्वेदानुसार बर्फाचे थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. आपल्या शरीराच्या तापमानानुसार पाणी जर आपण प्यायले तर पोषकतत्त्वांचे अधिक चांगले शोषण होते. ज्यामुळे चयापचनाची क्रिया वाढते हे साध्य करण्यासाठी माठातील पाणी महत्त्वाचे आहे.

- राजेंद्र जयवंत रांगणकरगणेशगुळे, रत्नागिरी 

अधिक वाचा: उन्हाळ्यात अतिथंड पाणी पिल्याने घशाला होतेय इजा; कशी घ्याल काळजी?

टॅग्स :पाणीतापमानआरोग्यहेल्थ टिप्सपर्यावरणनिसर्ग