अनिरूद्ध पाटील/सुरेश काटे
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विषम हवामानाचा प्रत्यय येत असून, याचा सर्वाधिक फटका मोसमी फळांना बसतो आहे. मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याने बागायतदार संकटात सापडला आहे.
आंबा, जाम, काजू, चिकू तसेच लिची, जांभळे व मोसमी फळांचे उत्पादन घटण्याची शक्यता असून, आर्थिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अस्थिर हवामान हा मुख्य घटक फळगळीस कारणीभूत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. राज्यात गेल्या दहा-पंधरा दिवसांत वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी पाऊसही पडला. जिल्ह्यातही वातावरण बदलाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता.
जिल्ह्यात यादरम्यान पाऊस पडला नसला तरी सकाळी, दुपारी तापमानात होणारी वाढ, दुपारनंतर ढगाळसदृश स्थिती तसेच आर्द्रतेत वाढ झाल्यामुळे आंबा, जाम, काजू, चिकू या फळांना त्याचा फटका बसला.
परिणामी, मोठ्या प्रमाणात फळगळ दिसून येत आहे तर प्रमुख मोसमी फळे म्हणून ओळखली जाणारी लिची व जांभूळ या फळांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना कृषीसल्ला
हवामानातील बदलामुळे परागीकरण नीट न होणे, नियमित सिंचनाचा अभाव तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता, कीड व रोगांचा प्रादुर्भाव ही फळगळतीची कारणे असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
तर झाडांना नियमित आणि संतुलित पाणी देणे, माती कोरडी पडू देऊ नये, अन्नद्रव्यांचा वापर करावा, पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. झाडांभोवती सेंद्रिय आच्छादन करावे, असा कृषी सल्ला देण्यात आला.
'जाम बागायतीत फेरफटका मारल्यास जमिनीवर फळेच फळे पडलेली दिसतात. ऐन मोसमात फळगळीने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.' - सुजय मोठे, बागायतदार, डहाणू.
अतिउष्ण तापमान व ढगाळ वातावरणामुळे फलगळती होत आहे. कीड रोगाच्या प्रमाणात वाढ होऊन आंबा पिवळा होऊन गळून पडतो. काही प्रमाणत झाडावर आलेला आंबाही गळून पडत आहे. - संदीप हरपाले, फळबाग शेतकरी.
यावर्षी माझ्या आंबा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रार करूनही मार्गदर्शन केले जात नाही. आंबा पिकावर लाखो रुपयांची औषध फवारणी करूनही पीक वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - रमाकांत हाडळ, शेतकरी.
हवामान विभागामार्फत हवामानात बदल झाल्याची नोंद घेतली जात असते. त्यानुसार कोणत्या भागात हवामान बदल होऊन पिकांचे नुकसान झाले आहे की नाही त्याची स्वयंचलित नोंद करण्यात येते. त्या ठरलेल्या निकषानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. - आर. यू. ईभाड, कृषी अधिकारी, तलासरी.
सुरूवातीस चांगला मोहर, मात्र झळांनी गेला जळून
आंबा हंगामास सुरुवातीच्या काळात योग्य वातावरण असल्याने या वर्षी झाडाला मोहर चांगला फुलला होता. त्यामुळे बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते;
परंतु गेल्या काही दिवसांपासून वाढलेली उष्णता आणि ढगाळ वातावरणामुळे परिसरात बदल झाला असून, त्याचा परिणाम आंबा बागायतीवर होत आहे. आंबा फळे गळून पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. तलासरी परिसरात सकाळी दहा वाजल्यानंतर कडक ऊन सुरू होते. त्यानंतर दुपारी प्रखर आणि गरम हवा, नंतर ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे त्याचा परिणाम फळबागांवर होऊन झाडावरील मोहर जळून काळा पडत आहे.
थोडीफार राहिलेली फळेही आता गळून पडत नुकसान होत आहे.
कृषी अधिकारी फिरकणार कधी ?
हवामानातील बदलांमुळे अतिउष्ण तापमान आणि ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे उपलाट, कोचाई, सावरोली, सूत्रकार, वेवजी, झाई बोरीगाव येथील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी सांगितले.
शेतकरी संकटात सापडला असताना कृषी अधिकारी आंबा बागायतीकडे कधी फिरकत नाहीत. शिवाय बागायतदार कृषी विभागाकडे गेल्यावर योग्य मार्गदर्शनही करीत नसल्याचा आरोप शेतकरी बागायतदारांनी केला आहे.
