अतिवृष्टीमुळे नुकसान झाले सुमारे ७० हजारांचे, पण भरपाई मिळाली अवघे २८०० रुपये. काटवन भागातील कजवाडे, रामपुरा भागांतील अशा काही शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईपोटी शासनाने दिलेली मदत अत्यंत तोकडी असल्याचा आरोप करत मदत नाकारून सदर रकमेचे धनादेश तहसीलदार विशाल सोनवणे यांना बुधवारी (दि.२९) परत केले. यावेळी शासनाचा निषेधही नोंदविण्यात आला.
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात चालू वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून अतिवृष्टीने थैमान घातले आहे. या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकाबरोबरच फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शासनाने जिरायती शेतीला साडेआठ हजार, बागायतीला १७ हजार, तर फळबांगाना २२ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई घोषित केली आहे.
त्यामुळे नियमानुसार तालुक्यातील ५७ हजार शेतकऱ्यांना मदतीचे धनादेश वाटण्यात आले असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यात काही शेतकऱ्यांना नियमानुसार समायोजित रक्कम कापून उर्वरित रकमेचे धनादेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
त्यातूनच तालुक्यातील रामपुरा, कजवाडे आदी काटवन भागातील शेतकऱ्यांनी मिळालेल्या मदतीचे धनादेश परत करण्यास सुरुवात केली असून, बुधवारी १० ते १२ शेतकऱ्यांनी तहसीलदार सोनवणे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले.
त्यामध्ये वासुदेव बोरसे, प्रवीण कदम, सागर भामरे, सोनू शिरसाठ, गणेश भामरे, योगेश बोरसे आदींचा समावेश आहे. सदर मदत ही अत्यंत तुटपुंजी असून, शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे.
अतिवृष्टी सुरूच
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काटवणसह तालुक्याच्या इतर भागांत सर्वत्र पाणी-पाणी झाले आहे. शेतशिवारातील पिकांमध्ये पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे. नव्याने झालेल्या या नुकसानीची भरपाई पुन्हा मिळेल काय, याबाबतही शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
माझी एक हेक्टर शेती असून, यात ७० क्विंटल मका येणे अपेक्षित होते. अतिवृष्टीमुळे नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे न करता सरसकट पंचनामे केले आहेत. माझे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, त्या बदल्यात मला केवळ २८०० रूपये मिळाले आहे. - सागर भामरे, शेतकरी, कजवाडे जि. मालेगाव.
समायोजन रक्कम वळती करण्याचा आदेश
• तालुक्यात २०२० मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी सरसकट नुकसानभरपाई देण्यात आली होती. मात्र, तालुक्यातील ८० हजार अपात्र शेतकऱ्यांना ७० कोटी ३५ लाखांची मदत देण्यात आली होती. सदर दिलेली रक्कम सदर नुकसानभरपाईतून समायोजित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
• तालुक्यात अपात्र शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ७० कोटी ३५ लाखांपैकी ७कोटी १२ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे या अपात्र शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या रकमेची सध्या देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेतून वसुली केली जात आहे.
• सप्टेंबर महिन्याच्या अतिवृष्टीच्या भरपाई रकमेतून संबंधिताकडे असलेली रक्कम वळती करून घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या नुकसानभरपाईपोटी मिळणाऱ्या मदतीत घट दिसत असल्याचे सांगितले जाते.
मदत वाटप करताना सर्व नियमांनुसार देण्यात येत आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे या मदतीतून समायोजीत रक्कम वळती करण्यात येत आहे. त्यात काही शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी असल्याने त्यांना नियमानुसार मदत दिली जात आहे. - विशाल सोनवणे, तहसीलदार.
