Join us

अतिवृष्टीमुळे ७१ कोटींहून अधिक कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान; बीड जिल्ह्यात सर्वाधिक २६ बंधाऱ्यांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:15 IST

सप्टेंबर महिन्यात राज्यात पडलेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका ५८ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांना बसला आहे. या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. या दुरुस्तीसाठी अंदाजे ७१ कोटी ४० लाख ६२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्राने दिली.

बापू सोळुंके 

सप्टेंबर महिन्यात राज्यात पडलेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत असलेल्या ५८ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांना बसला आहे.

या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे ७१ कोटी ४० लाख ६२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या उच्चपदस्थ सूत्राने दिली.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत मराठवाड्यातील आठ आणि शेजारील नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश होतो. यंदा सप्टेंबर महिन्यात या जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. याचा फटका शेतीमालासोबतच पाटबंधारे विभागाच्या मोठ्या बंधाऱ्यांनाही बसला.

महामंडळाने विभागातील १० मंडळ कार्यालयांना याविषयी सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. या मंडळांनी दिलेल्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासाठी सिंचन भवन येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली.

या बैठकीत गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या नुकसानीबाबत सादरीकरण केले. यानुसार बीड जिल्ह्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील २६ कोल्हापुरी बंधारे अतिवृष्टीमुळे क्षतीग्रस्त झाले.

बीड मंडळातील १३ कोल्हापुरी बंधारे दुरुस्तीसाठी ७ कोटी ९९ लाख २९ हजार, तर परळी मंडळातील १३ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ३३ कोटी ७५ लाख रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला. लातूर मंडळातील ११ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे पावसात नुकसान झाले. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ६८ लाख ८८ हजार रुपये लागतील, असा अंदाज आहे.

छत्रपती संभाजीनगर मंडळातील ३ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे पावसाने नुकसान केले. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याचे नमूद करण्यात आले. अहिल्यानगर मंडळ कार्यालयांतर्गत विविध ठिकाणच्या १० कोल्हापुरी बंधाऱ्यांचे पावसाने नुकसान केले.

या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ३ कोटी ९० लाख ४५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारे एकूण ५८ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ७१ कोटी ४० लाख ६२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

चार मंडळांतील कोल्हापुरी बंधारे सुरक्षित

गोदावरी महामंडळांतर्गत असलेल्या नाशिक, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील एकाही उच्च पातळी बंधाऱ्याचे नुकसान झाले नाही.

कोणत्या मंडळात किती बंधाऱ्यांचे नुकसान 

• बीड मंडळ - १३ • परळी मंडळ - १३ • लातूर मंडळ - ११ • अहिल्यानगर मंडळ - १० • छत्रपती संभाजीनगर मंडळ - ३ 

हेही वाचा : आता बोगस मजूर होणार आऊट! 'मनरेगा'त फेस ऑथेंटिकेशन प्रणालीद्वारे नोंदवली जाणार मजुरांची हजेरी

टॅग्स :पाणीमराठवाडापूरशेती क्षेत्रधरणनदीमहसूल विभाग