Join us
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीने गोंदियातील १३८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांचा तोंडचा घास मातीमोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:26 IST

गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी, बुधवारी गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील धान, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी (दि.५) गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील धान, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १३८९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान है गोरेगाव तालुक्यात झाले आहे.

तर बुधवारी (दि.६) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावल्याने त्यांच्यावर संकट ओढवले आहे

गेल्या खरीप हंगामात कीडरोग आणि परतीच्या पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू, या आशेने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लागवड केली. त्यामुळेच यंदा रब्बीचे लागवड क्षेत्र ७६ हजार हेक्टरवर पोहोचले. तर काही शेतकऱ्यांनी धानाला पर्याय म्हणून ७०० हेक्टरवर मका पिकाची लागवड केली होती.

रब्बीतील धान आणि मका पिकाला अनुकूल वातावरण मिळाल्याने दोन्ही पिके चांगली आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. मका पिकाची कापणी आणि मळणी सुरू आहे, तर रब्बीतील धानपीक निघण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांवर निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे.

हवामान विभागाने जिल्ह्यात ४ ते ९ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. मंगळवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. तर गोरेगाव, देवरी, गोंदिया तालुक्यात गारपीट झाली.

वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील उभा धान आडवा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर बुधवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने रब्बीतील पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पंचनामा करून नुकसानभरपाई द्या

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धानपिकासह मका आणि भाजीपाला पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुकानिहाय झालेले पिकांचे नुकसान

तालुका बाधित गावेबाधित क्षेत्रबाधित शेतकरी
गोंदिया१९१०८ हेक्टर४२३ 
गोरेगाव५८ १०९४ हेक्टर२०८६ 
तिरोडा५ ४.३० हेक्टर०६ 
देवरी  ६ ६.६० १६ 
आमगाव १८ ९३.३० १९० 
सालेकसा२३ ८२.७० १८७ 
एकूण १२९ १३८९.८० २९०८ 

धानाच्या कडपा भिजल्या, पाखड होण्याची शक्यता

 • गोरेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने १ हजार हेक्टरमधील रब्बी थानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

• अनेक शेतकऱ्यांनी थानाची कापणी करून ठेवली होती. त्या कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

वाळविलेला मका भिजला, विक्री करणार कसा?

अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाची कापणी आणि मळणी करून तो विक्री करण्यासाठी वाळवत घातला होता. मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मका भिजल्याने तो खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मका आता विक्री करायचा कसा आणि लागवड खर्च भरून काढायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान हे गोरेगाव तालुक्यातील पिकांचे झाले आहे. तर बुधवारीसुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नुकसानीचे पंचनामे केले जात आहे. - नीलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया.

हेही वाचा : लिहा येथील शेतकऱ्याची कन्या जिद्द अन् जिकाटीच्या जोरावर बनली न्यायाधीश; आरती सोनुणे यांचा संघर्षमय प्रवास 

English
हिंदी सारांश
Web Title : Hailstorm devastates crops in Gondia, farmers face huge losses.

Web Summary : Untimely rain and hailstorm in Gondia caused extensive damage to crops like paddy and maize across 1389 hectares, especially in Goregaon. Farmers, already struggling from previous losses, now face a severe crisis as their harvest is destroyed. Compensation is urged.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकविदर्भभात