कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील २०० मीटर परिघातील जमिनीचे क्षेत्र अकृषक म्हणून घोषित करण्यात येणार आहे. महसूल, भूमी अभिलेख प्रशासनातर्फे हे काम करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास गावठाणजवळचे नागरीकरण गतीने होणार आहे. एक गुंठ्यांच्या भूखंडाची खरेदी, विक्रीही सोपी होणार आहे.
मात्र, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलेल्या आदेशानुसार १ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व १२०० गावांत हे काम पूर्ण करणे प्रशासनासमोर आव्हानात्मक आहे. सर्वच गावाजवळच्या परिसरात प्रत्येक वर्षी घरांचे बांधकाम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
मूळ गावठाणपेक्षा गावाजवळच्या वसाहतीच वाढल्या आहेत. यामुळे शासनाने गावाजवळची २०० मीटरपर्यंतच्या जमिनी अकृषक करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याची अंमलबजावणी व्यापक प्रमाणात झाली नव्हती.
परिणामी गावठाण सोडूनच्या जमिनीत नियमानुसार घर बांधण्यासाठी अकृषकची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. ही प्रक्रिया किचकट आणि दिरंगाईची असल्याने अनेकजण अकृषक न करताच घर बांधत. म्हणूनच गावांच्या २०० मीटर परिघाच्या जमिनीच्या अंतरावरील जमीनधारकांची सुटका होण्यासाठी त्या जमिनीचे रेखांकन होणार आहे.
महसूल, भूमी अभिलेख प्रशासनाकडून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. गावपातळीवर याची जागृती तलाठी करणार आहेत. गावठाणजवळील २०० मीटर परिघातील सर्व गट नंबर एकत्रित करण्यात येणार आहेत. ते प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यासाठी १ नोव्हेंबरपर्यंतची वेळ निश्चित केली आहे.
पण, तोंडावर दिवाळी आहे. यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचे काही दिवस जाणार आहेत शिवाय भूमी अभिलेख विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे यामुळे या मुदतीत हे काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन
तालुका ठिकाणच्या गावांत बांधकाम क्षेत्र गतीने विस्तारत आहे. नागरीकरण झपाट्याने होत आहे. या गावांचा २०० मीटरपर्यंतचा परीघ अकृषक झाल्यानंतर पूर्वी झालेल्या इमारतींनाही फायदा होणार आहे. बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे.
