मुंबई : केंद्र सरकारच्यावतीने नाफेडच्या माध्यमातून 'भारत' ब्रँडची उत्पादने सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याचा भाग असलेली 'भारत' आटा (गव्हाचे पीठ), तांदूळ आणि कांदा ही उत्पादने राज्यात सहकारी ग्राहक भांडारच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
परवडणाऱ्या किंमतीत आवश्यक आणि दर्जेदार अन्नपदार्थाची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेनुसार केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने 'भारत' ब्रेड उत्पादनांची विक्री केली जात आहे. याच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मंत्री रावल यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. यावेळी नाफेडच्या वतीने राज्य प्रमुख भव्या आनंद उपस्थित होत्या.
मंत्री रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही फिरती वाहने विक्रीकरिता रवाना करण्यात आली, तर प्रातिनिधिक स्वरूपात ग्राहकांना या उत्पादनांचे वितरण करण्यात आले.
मंत्री रावल म्हणाले, राज्यात आणि देशात नाफेडचे जाळे पसरलेले आहे, त्या माध्यमातून या उत्पादनांची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी होत असल्याने कमी किमतीत यांची विक्री शक्य होत असून ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.
उत्पादने पोहोचविण्यासाठी मोबाइल व्हॅन तैनात
'भारत आटा'चे दर प्रतिकिलो ३१.५० रुपये, 'भारत तांदूळ'चे दर प्रति किलो ३४ रुपये असे बाजारभावापेक्षा कमी ठेवण्यात आले आहेत. कांदाही विक्रीसाठी आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी घरांपर्यंत थेट भारत बँड उत्पादने पोहोचविण्यासाठी मोबाइल व्हॅन तैनात केल्या आहेत, अशी माहिती नाफेडच्या राज्य प्रमुख भव्या आनंद यांनी यावेळी दिली.