Pune : लाळ- खुरकूत हा गाय, म्हैस, शेळ्या व मेंढयांमधील एक प्रमुख विषाणूजन्य व संसर्गजन्य रोग असून अनेक वर्षे लाळखुरकुत रोग हा पशुपालकांसमोरील एक आव्हान ठरला आहे. देशातील लाळ-खुरकूत रोगाचा फैलाव पशुजन्य पदार्थाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम घडवितो तसेच त्यांच्या निर्यातीवरही निर्बंध आणतो. त्यामुळे पशुपालनावर आधारित व्यवसायांचे होणारे आर्थिक नुकसान देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावर नकारात्मक प्रभाव पाडते. लाळ-खुरकूत रोगावर लसीकरणाद्वारे नियंत्रण मिळवणे ही पशुधन-विकासाच्या आणि पर्यायाने देशाच्या दृष्टीने एक प्राथमिकता आहे.
केंद्रपुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोगनियंत्रण या समूह गट योजनेमधील राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत लाळखुरकुत (FMD) व सांसर्गिक गर्भपात (Brucella) या दोन रोगांचे प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे सन २०३० पर्यंत नियंत्रण मिळवत देशातील ९ राज्ये लाळ खुरकत रोग मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा मानस असून महाराष्ट्र राज्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
राज्यात १४ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी - ७ पार पडली असून राज्यातील १५९ लक्ष गो व म्हैस वर्गीय पशुधनपैकी १५३ लक्ष पशुधनास लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण केले गेले आहे . लाळ खुरकत रोगाचे निर्मूलन होण्याकरिता या पशुधनास दर सहा महिन्यांनी लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. यास अनुसरून राज्यात १३ फेब्रुवारी २०२६ ते २९ मार्च २०२६ या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी - ८ राबविणेचे सुनिश्चित केले आहे. त्यासाठी आवश्यक लस व साधनसामग्रीचा पुरवठा पशुवैद्यकीय संस्थास्तरावर करण्यात येणार असून शीतसाखळी सुविधा, गावनिहाय मोहिमेचे व आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात येत आहे. लाळखुरकुत प्रतिबंधात्मक लसीकरण फ़ेरी- ८ राबविण्यास आवश्यक लसमात्रा डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या महिन्यात जिल्हास्तरावर केंद्रशासनाद्वारे पुरवठा करण्यात आल्या आहेत.
नुकत्याच केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या लाळ खुरकत लसीकरण मानक कार्यप्रणालीस अनुसरून केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पंचायती राज संस्था , शहरी स्थानिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी दुग्ध संस्था ,खाजगी पशुवैद्यक आणि पशुपालकांचा लसीकरण कार्यक्रमात सक्रीय सहभाग आवश्यक आहे.सदर फेरी दरम्यान पशूंच्या स्थलांतर मार्गांवरील, गोशाळेमधील आणिमोकाट पशु यांचे लसीकरण केले जाणार आहे तसेच लाळ खुरकत रोगाची बाधा होण्याची शक्यता असलेल्या वन्य प्राण्यांमध्ये रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वन क्षेत्राजवळील गावांतील पाळीव प्राण्यांमध्ये प्राधान्याने लाळ खुरकूत लसीकरण मोहिम राबविणेत येणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुंचे आरोग्य जोपासणे, लाळ खुरकूत रोगप्रसार थांबविणे,पशूंची उत्पाकता वाढविणे तसेच रोगांमुळे पशुपालकाचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडे संपर्क साधून आपल्या गो व म्हैस वर्गीय पशुधनास लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मत्स्यविकास विभाग महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ.रामास्वामी एन. व पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.
