यंदाच्या येत्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले असून, शेतकऱ्यांनीही पेरणीची पूर्वतयारी सुरू केली आहे.
पेरणीच्या कालावधीत शेतकऱ्यांना पुरेसे आणि गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करण्यासाठी कृषी विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत अकोला जिल्ह्यातील ३ हजार ६४० बियाणे, खते व कीटकनाशके विक्री केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पेरणीसाठी जिल्ह्यात लागणारे बियाणे, तसेच खते व कीटकनाशकांची उपलब्धता यासंदर्भात कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने तपासणी करण्यात येणार आहे.
१५ मे पासून तपासणी!
• कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत येत्या १५ मे पासून जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
• तपासणीत कृषी निविष्ठा विक्री केंद्राचा परवाना, विक्री केंद्र व गोदामातील साठा, शेतकऱ्यांच्या तक्रारी, आदी मुद्द्यांची तपासणी भरारी पथकांकडून केली जाणार आहे.
येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरेसे आणि गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कीटकनाशके इत्यादी कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्या, त्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांकडून जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे. - डॉ. तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद अकोला.