Join us

पुराने वाहून गेले विदर्भाच्या 'या' जिल्ह्यातील ५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील धानपीक; सर्व्हेक्षणाचा प्राथमिक अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:51 IST

मागील आठवड्यात संततधार पडलेला पाऊस व गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडताच आलेल्या पुराने चंद्रपूर जिल्ह्यात सात हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यात वाहून गेलेल्या ५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील धान शेतीचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक अहवालातून पुढे आली.

मागील आठवड्यात संततधार पडलेला पाऊस व गोसेखुर्द धरणाचे ३२ दरवाजे उघडताच आलेल्या पुराने चंद्रपूर जिल्ह्यात सात हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यात वाहून गेलेल्या ५ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रातील धान शेतीचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक अहवालातून पुढे आली.

कृषी व महसूल विभागाकडून पंचनामे सुरूच असून नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. पुराचा सर्वाधिक तडाखा ब्रह्मपुरी, सावली, मूल, पोंभुर्णा तालुक्यांना बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भात, सोयाबीन व कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. सोयाबीन व कपाशीच्या पेरण्या पूर्ण झाल्या. पुरेसा पाऊस न पडल्याने रोवणीची कामे अजूनही सुरू आहेत.

काही प्रमाणात सिंचनाची सुविधा असलेल्या ब्रह्मपुरी, मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही तालुक्यात रोवणीची टक्केवारी अधिक आहे. अशातच मागील आठवड्यात चार दिवस मुसळधार पाऊस बरसला. दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे सर्व ३२ दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला. या पुराचा मोठा फटका धानाला बसला.

तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर असलेल्या लाडज, पिंपळगाव भोसले व परिसरातील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. पुराने शेकडो हेक्टरवरील पिके पाण्यात होती.

१६९ गावांना तडाखा

६ ते १० जुलै या कालावधीतील पावसाने जिल्ह्यातील १६२ गावे बाधित झाली. त्यामध्ये सावली तालुक्यात ५१, ब्रह्मपुरी ९६ व पोंभुर्णा तालुक्यातील १६ गावांचा समावेश आहे. ५ हजार ३१७ हेक्टरवरील धान वाहून गेले. पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होणार आहे.

७ हजार ७८१ शेतकरी बाधित

• जुलै महिन्यात चार दिवस पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ७ हजार ७८१ शेतकऱ्यांना बसला आहे.

• सर्वाधिक फटका ब्रह्मपुरी तालुक्यातील ३ हजार ५६९ शेतकऱ्यांना बसला. सावली तालुक्यातील ३ हजार ३७९ शेतकऱ्यांना पुराची झळ बसली. मूल तालुका ३४२ व पोंभुर्णा तालुक्यात ४९० शेतकऱ्यांना पुराचा फटका बसल्याची माहिती आहे.

• प्राथमिक अहवालानुसार,चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सात हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाकडून पंचनामे सुरूच असून, अंतिम अहवाल येण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...तर नुकसानीची तीव्रता वाढली असती

प्राथमिक अहवालानुसार, पुराने जिल्ह्यातील ५ हजार ३१७ हेक्टरवरील धान वाहून गेले. काही ठिकाणी थानाचे पन्हे वाया गेले. शेकडो शेतकऱ्यांचे रोवणे अजूनही पूर्ण झाले नाही. रोवणी आटोपली असती तर नुकसानीची व्याप्ती पुन्हा वाढली असती. धान व अन्य पिके मिळून सहा हजारांहून अधिक क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज आहे.

कृषी विभागाद्वारे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नुकसानीचे कोणतेही क्षेत्र सुटणार नाही, याकडे लक्ष दिले जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार ७ हजार १०४ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल जाहीर होईल. - शंकर तोटावार, जि. अधीक्षक कृषी अधिकारी.

 हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप

टॅग्स :भातशेती क्षेत्रविदर्भशेतकरीशेतीपूरपाणीपाऊसपीकसरकार