Pune : राज्यात सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर मागील दोन ते तीन आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ सप्टेंबर महिन्यातील २६ दिवसांत राज्यातील २२ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये सर्वांत जास्त नुकसान हे बीड जिल्ह्याचे झाले आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून यामुळे पीके मातीसह वाहून गेले आहेत. तर घरे, दुकाने पाण्याखाली गेले असून राज्यात आत्तापर्यंत ५७ हजारांपेक्षा जास्त पशुधन मृत्युमुखी पडले आहे. यासाठी सरकारने नुकसान भरपाईची घोषणा केली आहे पण शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
सर्वांत जास्त नुकसान हे बीड जिल्ह्यामध्ये ५ लाख ७१ हजार १०० हेक्टर एवढे झाले असून कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, बाजरी, भुईमूग, मका, ऊस, कांदा, भाजीपाला व फळपिके या पिकाचे झाले आहे. तर येथे केवळ ११ दिवसांमध्ये म्हणजे १३ ते २४ सप्टेंबर यादरम्यानच एवढे नुकसान झाले आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान? (२७ सप्टेंबर रोजीचा अहवाल)
- बीड - ५ लाख ७१ हजार १०० हेक्टर
- जालना - २ लाख ७३ हजार ८६१ हेक्टर
- छत्रपती संभाजीनगर - १ लाख ६६ हजार २२६ हेक्टर
- धाराशिव - १ लाख ८१ हजार २०० हेक्टर
- अहिल्यानगर - ३ लाख ७ हजार ७४५ हेक्टर
- सोलापूर - ३ लाख ५१ हजार ४३७ हेक्टर
- यवतमाळ - १ लाख ३७ हजार ५६८ हेक्टर