सोयाबीन, हरभरा आणि तुरीला इतर व्यापाऱ्यांपेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून दोन वर्षात सव्वा दोन कोटी रुपयांचा माल पाच व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता. परंतु मालाची देयके मागण्यासाठी गेले असताना त्यासाठी नकार देण्यात आला. ही घटना नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद शहरात घडली. या प्रकरणात शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यावरून पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
बालाजी लक्ष्मण देवकर रा. समराळा, ता. धर्माबाद यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी धर्माबाद येथील श्रीकृष्ण भुसार दुकानातील लक्ष्मण कोंडिबा देवकर, सायन्ना गंगाराम इप्तेकर, पोतन्ना सायन्ना इप्तेकर, बालाजी सायन्ना इप्तेकर आणि संजय गंगाधर देवकर या पाच जणांनी इतर व्यापाऱ्यांपेक्षा तुमच्या मालाला अधिकचा दर देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यामुळे दोन पैसे अधिकचे मिळतील म्हणून अनेक शेतकऱ्यांना २०२२ ते डिसेंबर २०२४ या काळात सोयाबीन, हरभरा आणि तूर असा जवळपास २ कोटी २७लाख २८ हजार रुपयांचा २ हजार ६६४ क्विंटल माल या व्यापाऱ्यांना दिला होता.
अनेक शेतकऱ्यांची केली फसवणूक
या विक्री केलेल्या मालाची रक्कम मागण्यासाठी शेतकरी गेल्यावर मात्र त्यांना टाळाटाळ सुरू झाली. शेतकऱ्यांना या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी पाचही व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या व्यापाऱ्यांनी आणखी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप